IndiaNewsUpdate : दिल्ली आणि एनसीआरमध्ये पावसाने झोडपले , नागरिकांना घरातून काम करण्याचा सल्ला

गुरुग्राम : दिल्ली आणि एनसीआरमध्ये आज सकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे रस्ते जलमय झाले असून बराच काळ जाम झाला आहे. गुरुग्राममधील बख्तावर चौक, एमडीआय चौक, डीएलएफ फेज 1 मेट्रोजवळील परिसर, कन्हाई चौक, अग्रसैन चौक आणि इतर अनेक भागात पाणी साचले आहे. दरम्यान 23 मे रोजी अतिवृष्टीचा इशारा लक्षात घेता, गुरुग्रामच्या जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी लोकांना घरातून काम करण्याचा सल्ला दिला आहे.
अतिवृष्टीचे संकट लक्षात घेता , जिल्हाधिकाऱ्यांनी खाजगी संस्था/कॉर्पोरेट कार्यालयांना त्यांच्या कर्मचार्यांना घरून काम करण्याचे आदेश देण्यास सांगितले आहे. दरम्यान रस्त्यांवरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी लोकांनी रस्त्यावर गर्दी करू नये तसेच नागरी संस्थांना दुरुस्तीची कामे जलदगतीने करावीत असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सुचविले आहे. गुरुग्राम वाहतूक पोलिस रस्त्यांवरील जाम कमी करण्यात गुंतले आहेत.
We do not have that option, but those who do, may consider exercising the option to work from home.
Meanwhile, Gurgaon Police is on the roads to assist you ….@gurgaonpolice pic.twitter.com/A7utm7XSjs— Gurugram Traffic Police (@TrafficGGM) May 23, 2022
दरम्यान, गुरुग्राम ट्रॅफिक पोलिसांनी लोकांना आवाहन केले आहे की जर ते घरून काम करू शकत असतील तर कार्यालयात येऊ नका. गुरुग्राम ट्रॅफिक पोलिसांनी ट्विट केले की, “आमच्याकडे तो पर्याय नाही, पण जे करतात त्यांनी घरून काम करण्याचा पर्याय वापरण्याचा विचार करावा. गुडगाव पोलिस तुमच्या मदतीसाठी रस्त्यावर उतरले आहेत.” जयपूर राष्ट्रीय महामार्गावरही पाणी साचण्याची समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. गुरुग्राम वाहतूक पोलिसांनी सांगितले की, राष्ट्रीय महामार्ग NH 48 आणि जयपूर राष्ट्रीय महामार्गावरही आज सकाळपासून पाणी साचले आहे.
दिल्लीचीही अवस्था वाईट
वादळ आणि पावसामुळे सोमवारी सकाळी दिल्लीत किमान तापमान 18 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. वादळामुळे राष्ट्रीय राजधानीच्या काही भागात झाडे उन्मळून पडली आणि आठवड्याच्या पहिल्या कामकाजाच्या दिवशी ITO, DND आणि AIIMS जवळ विविध ठिकाणी ट्रॅफिक जाम झाल्याची नोंद झाली.
हवामान खात्यानुसार, या मोसमातील हे पहिले मध्यम-तीव्रतेचे वादळ होते. १ मार्चपासून उन्हाळ्याची सुरुवात मानली जाते. हवामान खात्याने सांगितले की, “सर्वसाधारणपणे मार्च ते मे दरम्यान 12 ते 14 दिवस पाऊस आणि गडगडाट असतो. मात्र या हंगामात केवळ चार ते पाच वेळा पाऊस पडला आणि तोही बहुतांशी कोरडाच होता. 21 ते 24 मे दरम्यान जोरदार वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.