IndiaNewsUpdate : फुटपाथवर झोपलेल्या मजुरांना ट्रकने चिरडले , ३ ठार ११ जखमी

चंदीगड : हरियाणाच्या झज्जरमध्ये एका ट्रकने रस्त्याच्या कडेला झोपलेल्या लोकांना चिरडल्याचे वृत्त आहे. यामध्ये तीन मजुरांचा मृत्यू झाला असून ११ जण जखमी असल्याचं सांगण्यात येत आहे. झज्जर जिल्ह्यातील आसोधा टोल प्लाझापासून सुमारे २ किमी अंतरावर असलेल्या कुंडली-मानेसर-पलवल द्रुतगती मार्गावर पहाटे हि दुर्घटना घडली.
या विषयीची अधिक माहिती अशी कि , ट्रक चालकाचे अचानक गाडीवरील नियंत्रण सुटल्याने तो रस्त्यावरून फुटपाथवर गेला. या फुटपाथवर अनेक मजूर झोपले होते, त्यांना या ट्रकने चिरडले . या मजुरांना चिरडत ट्रक पुढे गेला आणि नंतर उलटला. जखमी झालेल्या ११ जणांपैकी काही जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. सर्व जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
या अपघाताबाबत वरिष्ठ पोलीस अधिकारी अमित यशवर्धन यांनी सांगितले की, तीन मजुरांचा जागीच मृत्यू झाला असून ११ लोकांना उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी दहा जणांना पीजीआयएमएस, रोहतक येथे पाठवण्यात आले आहे . याच रस्त्यावरील एका पुलाच्या बांधकामावर काम करणारे हे मजूर होते . त्यांच्या नावांची अद्याप पुष्टी झालेली नाही, परंतु ते उत्तर प्रदेशातील दोन जिल्ह्यातील होते, सही माहिती असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
दरम्यान अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून पळून गेला. पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की त्याच्या क्रमांकावरून शोध घेण्यात आला असून त्याने या ट्रॅकवर दोन ड्रायव्हर आणि एक मदतनीस असल्याची माहिती दिली आहे. त्यांच्या अटकेसाठी प्रयत्न चालू आहेत.