MaharashtraPoliticalUpdate : ठरलं ….राज ठाकरे पुन्हा बोलणार , तारीखही ठरली …

मुंबई : पुण्याची सभा होणार कि नाही होणार यवरची चर्चा थांबवत राज ठाकरे यांनी आता आपली सभा रविवारी (२२ मे) गणेश कला क्रीडा मंच येथे होणार असल्याचे कळविले आहे. त्यामुळे राज ठाकरे पुन्हा बोलणार हे आता नक्की झाले आहे.
पाडव्याच्या मुहूर्तावर आपल्या टोलेबाजीला सुरुवात करीत राज ठाकरे यांनी तीन सभा केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी एकाच सभेत भाजप आणि मनसेला मनसोक्त ठोकले होते . या सभेत राज ठाकरे यांच्या नावाचा थेट उल्लेख टाळत त्यांची तुलना मुन्नाभाई या पात्राशी केली होती. त्याला आता राज ठाकरे यांनी पुन्हा उत्तर देण्याचा निर्णय घेतला आहे. या निमित्ताने पुण्यातील सभेची अधिकृत घोषणा करण्यासाठी आणि अयोध्या दौऱ्यावर जाण्यापूर्वी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधण्यासाठी राज ठाकरे पुण्यामध्ये आले होते.
मंगळवारी रात्री अक्षरधारा बुक गॅलरी येथून त्यांनी पुस्तकांची खरेदी केली होती. मात्र, अचानक ठाकरे यांना पुण्याचा दौरा अर्धवट ठेवून मुंबईला परतावे लागले होते. त्यानंतर ही सभा होईल की नाही या विषयी प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. मात्र,आता ही सभा रविवारी गणेश कला क्रीडा मंच येथे होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
याबाबत मनसे नेते बाबू वागसकर यांनी सांगितले होते की, राज ठाकरे यांच्या सभेसाठी डेक्कन येथील नदी पात्रातील जागा मिळावी, याबाबत पोलिसांकडे अर्ज केला होता. मात्र हवामान विभागाने २३ तारखे पर्यंत जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. तसेच नदीपात्रात मेट्रोचे काम देखील सुरू आहे. अशात जोरदार पाऊस आला तर सभेच्या ठिकाणी येणार्या नागरिकांना मोठा त्रास होऊ शकतो.त्यामुळे आम्ही नदी पात्रातील ठिकाण रद्द केले असून आम्हाला अन्य तीन ठिकाणांची परवानगी मिळाली आहे. त्या ठिकाणाबाबत राज ठाकरे उद्या स्वतः जाहीर करतील. या आठवड्याच्या शेवटी ही सभा होणारच आहे. कोणत्याही परिस्थितीत सभा रद्द होणार नाही.”