AurangabadNewsUpdate : औरंगाबादच्या पाणी प्रश्नावर भाजप पेटला , २३ ला देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा

औरंगाबाद : ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेने औरंगाबाद शहरातील पाणीपट्टी निम्म्यावर आणली. मात्र, शिवसेनेचा हा निर्णय भारतीय जनता पक्षासह एमआयएमला पसंत पडलेला नाही. मनपाने औरंगाबादकरांना पाणी पुरवठा न करता आजपर्यंत वसुल केलेली कोट्यवधींची पाणी पट्टीची रक्कम व्याजासह परत करुन सध्या लोकांकडे थकीत पाणी पट्टी पूर्णपणे माफ करण्याची मागणी एमआयएमने प्रशासक अस्तिककुमार पांडेय यांच्याकडे केली आहे. तर भाजपने पाणीपट्टी कपात ही जनतेच्या डोळ्यात निव्वळ धूळफेक असल्याचा आरोप केला. तसेच पाणी प्रश्नावर तीन मागण्या करतानाच २३ मे रोजी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेवर आक्रोश मोर्चा काढणार असल्याचे म्हटले आहे.
शहरातील पाणी प्रश्न आणि मोर्चाची माहिती देण्यासाठी आज केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी आ. अतुल सावे, शहराध्यक्ष संजय केणेकर, माजी महापौर बापू घडामोडे आदी उपस्थित होते. यावेळी डॉ. कराड म्हणाले, पिण्याच्या पाण्यासाठी शहरवासीयांची फरपट होत आहे. शहरात पाण्याच्या टाक्या बांधून ठेवलेल्या आहेत. पण त्यात पाणी नाही. आधी पाणी योजनेसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने थातुरमातुर काम केले.
आ. अतुल सावे मंत्री असताना १६८० कोटी रुपयांची पाणी योजना मंजूर करण्यात आली. त्याच्या केवळ एक टक्का म्हणजे १६.८० कोटी रुपये महापालिकेला भरायचे होते. पण तेवढेही पैसे महापालिकेकडे नव्हते. त्यावरही देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना तोडगा काढला होता. पण सध्याच्या महाविकास आघाडी सरकारने ते बदलून एक तृतीयांश पैसे भरण्याची सक्ती महापालिकेला करून तसे आयुक्तांकडून लिहून घेतले. आणि आता राज्य सरकार केंद्राने दिलेले पैसे महापालिकेला देत आहे आणि त्यातून कंत्राटदाराकडून काम करून घेतले जात आहे. तेही काम अत्यंत संथगतीने सुरु आहे.
दुसरीकडे, शहरात पाण्यासाठी लोकांना मोर्चे काढावे लागत आहेत. आंदोलने करावी लागत आहेत. मात्र, शहर आणि राज्याचे प्रशासन त्याची दखल घ्यायला तयार नई. त्यामुळे या प्रशासनाला जागे करण्यासाठी २३ मे रोजी भाजपच्या वतीने ‘आक्रोश हंडा मोर्चा’ काढण्यात येणार आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली निघणाऱ्या या मोर्चाची सुरुवात पैठणगेट येथून सायंकाळी चार वाजता होतील आणि तो नंतर महापालिकेवर धडकेल, असे डॉ. कराड म्हणाले.