IndiaNewsUpdate : ज्ञानवापी मशीद प्रकरणी उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

नवी दिल्ली : ज्ञानवापी मशिदीतील सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीच्या याचिकेवर मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती पीएस नरसिंहा यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी होणार आहे. ज्ञानवापी वाद प्रकरणी याचिकाकर्ते अंजुमन इनझानिया मस्जिद समितीने ज्ञानवापीमधील सर्वेक्षणावर बंदी घालण्याची मागणी केली आहे.
या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या अर्जात असे म्हटले आहे की, अलाहाबाद उच्च न्यायालयाने 1991 मध्ये दाखल केलेल्या मूळ खटल्याला आधीच स्थगिती दिली आहे. पण या प्रकरणाला बगल देण्यासाठी 2021 मध्ये दुसरी याचिका दाखल करण्यात आली. या प्रकरणात दोन्ही याचिका प्रार्थनास्थळ कायदा 1991 च्या विरोधात आहेत. अयोध्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांच्या खंडपीठानेही आपल्या निर्णयाद्वारे या कायद्यावर शिक्कामोर्तब केले होते.
वाराणसी न्यायालयाने ज्ञानवापी आणि शृंगार गौरी प्रकरणांमध्ये सर्वेक्षण करण्यापूर्वी समितीच्या हरकतींचा विचार केला नाही. ही नवी याचिका 1991 मध्ये मंदिराच्या वकिलांनी दाखल केली होती. अयोध्येतील राम मंदिराव्यतिरिक्त कोणत्याही परिस्थितीत कोणताही बदल होणार नाही, या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयात प्रार्थनास्थळ कायद्याची पुष्टी झाली असताना वाराणसी न्यायालयाने हा आदेश कसा दिला ? असा प्रश्न उपस्थित केला गेला आहे.
कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत ज्ञानवापी मशीद संकुलाचे सर्वेक्षण
दरम्यान आज ज्ञानवापी शृंगार गौरी मशिदीच्या तिसऱ्या दिवसाचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. या सर्वेक्षणाचा अहवाल उद्या न्यायालयात सादर केला जाणार आहे. उत्तर प्रदेशातील वाराणसी जिल्ह्यात आज सलग तिसऱ्या दिवशी कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत ज्ञानवापी मशीद संकुलाचे सर्वेक्षण-व्हिडिओग्राफीचे काम सुरू झाले. यावेळी वकील आयुक्तांसह वादी व प्रतिवादी हे सर्वजण ज्ञानवापी मशिदीत उपस्थित होते.
सर्वेक्षणाबाबत माहिती देताना सरकारी वकील महेंद्रप्रसाद पांडे म्हणाले की, आज सर्वेक्षण आयोगाचे काम पूर्ण झाले आहे. आयोगाने प्रत्येक ठिकाणची बारकाईने व्हिडिओग्राफी केली आहे. तिन्ही घुमट, तळघर, तलाव या सर्व ठिकाणी नोंदी करण्यात आल्या आहेत. उद्या अॅडव्होकेट आयुक्त कोर्टात आपला अहवाल सादर करतील. तीन सदस्य आज हा अहवाल तयार करणार आहेत. अहवाल पूर्ण न झाल्यास उद्या न्यायालयाकडे आणखी वेळ मागू शकतो. संपूर्ण प्रक्रिया शांततेत पार पडली.
विहिरीत शिवलिंग सापडल्याचा दावा
या सर्वेक्षणासंदर्भात इंडिया टुडेच्या आज तक या वृत्तवाहिनीशी बोलताना या प्रकरणामध्ये हिंदूंची बाजू मांडणारे वकील विष्णू जैन यांनी मोठा दावा केलाय. फोनवरुन दिलेल्याम माहितीमध्ये विष्णू जैन यांनी मशिदीच्या परिसरात असणाऱ्या विहिरीमध्ये शिवलिंग सापडल्याचा दावा केलाय. या शिवलिंगाच्या संरक्षण आणि जतन केलं जावं या मागणीसाठी आपण स्थानिक न्यायालयामध्ये अर्ज करणार असल्याचंही जैन म्हणाले.
जैन यांनी दिलेल्या माहितीनुसार हे शिवलिंग १२ फूटांचे असल्याची माहिती देण्यात आलीय. हिंदूंची बाजू मांडणारे दुसरे वकील मदन मोहन यादव यांनी हे शिवलिंग म्हणजे नंदीचा चेहरा असल्याचा दावा केलाय.
गेल्या आठवडय़ात या मशिदीच्या व्यवस्थापन समितीने आक्षेप घेतल्यानंतर हे सर्वेक्षण थांबले होते. सर्वेक्षणासाठी न्यायालयाने नियुक्त केलेल्या विधि आयुक्तांना आवारात चित्रीकरण करण्याचा अधिकार नसल्याचा दावा या व्यवस्थापन समितीने केला होता, मात्र न्यायालयाच्या परवानगीने हे सर्वेक्षण सुरू झाले. महिलांच्या एका समूहाने या मशिदीच्या बाहेरील भिंतीलगत असलेल्या देवतांच्या मूर्तीची पूजा करण्याची परवानगी मागण्यासाठी स्थानिक न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर सुनावणी सुरू आहे.
रविवारी आणि सोमवारी या मशिदीची पाहणी कडक सुरक्षेत सकाळी आठ ते दुपारी बारापर्यंत केली गेली. याविषयी वाराणसीचे जिल्हाधिकारी कौशलराज शर्मा यांनी सांगितले की, न्यायालयाने नियुक्त केलेल्या तीन विधि आयुक्तांसह सर्व पक्षांच्या प्रतिनिधींचा समावेश आलेल्या न्यायालयीन आयोगाने सकाळी आठला ही पाहणी सुरू केली होती.