VidarbhaNewsUpdate : नाना पटोले यांनी भाजपशी हात मिळवणी करणाऱ्या राष्ट्रवादीवर केला पाठीत सूर खुपसल्याचा आरोप

भंडारा : भंडारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीने युती केल्यानंतर नाराज झालेल्या नाना पटोले यांनी राष्ट्रवादीने आमच्या पाठीत सुरा खुपसला अशा शब्दात टीका केली आहे. मात्र भंडाऱ्यात काँग्रेसने सर्वांनाच धोबीपछाड देत अध्यक्षपद आपल्याकडे खेचले आहे तर माजी आमदार चरण वाघमारे यांच्या गटाला उपाध्यक्षपद दिले आहे. त्यांच्या या कृत्यामुके भाजपने सहा वर्षांसाठी हकालपट्टी केली आहे .
यावर आपली प्रतिक्रिया देताना काँग्रेस नेते नाना पटोले म्हणाले की, “राष्ट्रवादीने अनेक ठिकाणी भाजप सोबत युती करत सत्ता स्थापन केली आहे. आम्ही यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि प्रफुल पटेल यांच्या सोबत चर्चा केली. त्यानंतरही राष्ट्रवादीने प्रत्येक ठिकाणी भाजपसोबत युती केली. गोंदिया जिल्हा परिषदमध्येसुध्दा राष्ट्रवादीने भाजपसोबत जात युती केली. राष्ट्रवादीने आमच्या पाठीत सुरा खुपसला.
भंडारा आणि गोंदियात राष्ट्रवादीने मित्र पक्ष काँग्रेसची साथ सोडून भाजप बरोबर हात मिळवणी केली. यामुळे काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या भंडारा जिल्ह्यातच महाविकास आघाडीत बिघाडी झाली आहे. मात्र नाना पटोले यांनीही भाजप मधील एक गट फोडला. भाजपच्या चरण वाघमारे गटाने काँग्रेसला साथ दिली आणि त्या ठिकाणी अध्यक्षपद हे काँग्रेसला मिळाले तर उपाध्यक्षपद हे चरण वाघमारे गटाला मिळाले . भंडारा जिल्हा परिषदेत काँग्रेसचे 21, भाजपचे 12, राष्ट्रवादीचे 13 आणि शिवसेनेचा एक असे संख्याबळ आहे.
दरम्यान यामुळे माजी आमदार चरण वाघमारेची भंडारा भाजपातून सहा वर्षासाठी हकालपट्टी करण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. आजच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडणुकीत वाघमारे गटाने नाना पटोलेंना साथ दिल्याने भाजपने ही कारवाई केली आहे. दरम्यान गोंदियामध्ये भाजप आणि राष्ट्रवादीने एकत्र येऊन काँग्रेसला एकटे पाडले. तिथे अध्यक्षपदासाठी भाजपचे पंकज रहांगडाले आणि उपाध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीच्या यशवंत गणवीर यांची निवड झाली. महाविकास आघाडीत जरी पटोले आणि प्रफुल पटेल हे एक असले, तरी भंडारा-गोंदियात हे ऐक्य नाही. या दोघांमधील पारंपरिक वैर पुन्हा एकदा समोर आले आहे. याचा येणाऱ्या निवडणुकांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.