ShahuRajaNewsUpdate : शाहू महाराजांची आज स्मृतिशताब्दी , १० वाजता , १०० सेकंद उभे राहून आदरांजली वाहूयात …!!

कोल्हापूर : बहुजनाच्या आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराजांची आज 100 वी पुण्यतिथी आहे. यानिमित्ताने कोल्हापुरात आज शाहूराजांना आदरांजली म्हणून आज सकाळी 10 वाजता कोल्हापूर 100 सेकंदासाठी स्तब्धता पाळली जाणार असून राज्यातील नागरिकांनीही आपण जेथे असू तेथे १०० सेकंद थांबून आदरांजली वाहावी. ही स्तब्धता म्हणजे आपल्या आवडत्या राजाला, रयतेच्या राजाला, शाहू महाराजांना त्यांच्या 100व्या स्मृती दिनानिमित्त केले जाणारे सामूहिक वंदन असणार आहे.
6 मे 1922 या दिवशी मुंबई येथील पन्हाळा लॉज या ठिकाणीराजर्षी शाहू महाराजांचे निधन झाले. त्या दिवसाला आज 100 वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने संपूर्ण कोल्हापुरात 100 सेकंदासाठी सकाळी 10 वाजता स्तब्ध उभे राहून त्यांना मानवंदना देण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने कोल्हापुरातील सर्व व्यवहार 100 सेकंदासाठी थांबवण्यात येणार आहेत. या वंदन कार्यक्रमात केवळ शहरच नव्हे तर जिल्ह्यातील, राज्यातील, परदेशातील ज्यांना शाहू महाराजांची थोरवी माहिती आहे ते कोणीही त्यांच्यासाठी स्तब्ध राहून सहभागी होऊ शकणार आहेत. या निमित्ताने राजर्षी शाहू महाराजांनी रयतेसाठी, समाजासाठी आणि देशासाठी काय योगदान दिले आहे, काय कार्य केले आहे त्याचे स्मरण केले जाणार आहे.
लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी वर्षानिमित्त कोल्हापुरात आज दसरा चौक ते शाहू महाराज समाधी स्थळ इथपर्यंत कॅन्डल मार्च काढत लोक राजाला आदरांजली वाहिली. या कँडल मार्चमध्ये पालकमंत्री सतेज पाटील, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा पोलीस प्रमुख शैलेश बलकवडे कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त कादंबरी बलकवडे यांच्यासह अनेक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थिती लावली. 6 मे रोजी म्हणजे शुक्रवारी सकाळी 10 वाजता 100 सेकंद उभे राहून लोक राजाला आदरांजली वाहूया असे आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी यावेळी केले.