RanaNewsUpdate : हनुमान चालीसा पठण प्रकरण : राणा दाम्पत्याचा तुरुंगातील मुक्काम वाढला

मुंबई : मुख्यमंत्र्यांच्या मातोश्री बंगल्यासमोर हनुमान चालीसा पठण करण्याच्या नादात अटकेत असलेल्या अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांचा तुरुंगातील मुक्काम आणखी वाढला आहे . राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जावर आज मुंबई सत्र न्यायालयात आज सुनावणी झाली. या सुनावणीत दोन्ही बाजूने युक्तीवाद झाला. दरम्यान या युक्तीवादानंतर न्यायालयाने राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जावर सोमवारी म्हणजेच २ मे रोजी सुनावणी ठेवली आहे. तोपर्यंत राणा दाम्पत्याला तुरुंगातच राहावे लागणार आहे.
दरम्यान, विशेष सरकारी वकील प्रदिप घरत यांनी काल कोर्टात १८ पानी लेखी युक्तीवाद सादर केला होता. त्यानंतर कोर्टात आज राणा दाम्पत्याचे वकील आबाद पोंडा यांनी युक्तीवाद सुरु केला. त्यानंतर सरकारी वकिलांनी युक्तीवाद केला. २४ एप्रिलपासून राणा दाम्पत्य हे न्यायालयीन कोठडीत असून त्यांनी केलेल्या जामीन अर्जावर आज सुनावणी झाली. पण या सुनावणीत निकाल जाहीर करण्यात आला नाही. निकाल हा सोमवारी जाहीर केला जाणार असल्याची शक्यता आहे.
राणा दाम्पत्याच्या वकिलांचा युक्तीवाद
राणा दाम्पत्याचे वकील आबाद पोंडा यांनी न्यायालयासमोर युक्तिवाद करताना म्हटले आहे कि , आज कुठे उभे राहून प्रार्थना बोलणे कठीण झाले आहे. हनुमान चालीसा म्हणणार म्हणून जेलमध्ये जावे लागत आहे. मी आज कोर्टाचा वेळ घालवणार नाही. पण फक्त एवढेच सांगायचे आहे की, दोघेही लोकप्रतिनिधी आहेत. त्यांचे आठ वर्षांचे मूल घरी आहे. दोघेही अमरावतीवरुन मुंबईला आले. मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर हनुमान चालीसा म्हणणार असे बोलले होते. मातोश्री हे मुख्यमंत्र्यांचे खाजगी निवासस्थान आहे, शासकीय निवासस्थान नाही. तरीही दोघांना कलम १४९ नुसार नोटीस पाठवली होती . मुद्दा एवढा आहे की राणा दाम्पत्यांना उद्धव ठाकरे यांच्या घराबाहेर हनुमान चालीसा वाचायची होती. वर्षा नाही मातोश्री जे त्यांचे खासगी निवासस्थान आहे. हनुमान चालीसा वाचायची असतांना हिंसा का करु? आम्ही कोणत्याही धर्माला इजा पोहोचवणार नव्हतो. मुख्यमंत्री हिंदुत्ववादी आहेत. त्यांच्याच घरासमोर हनुमान चालीसा वाचायची होती. हनुमान चालीसा वाचून आम्ही मातोश्रीचा अपमान कुठे करत होतो?
विशेष सरकारी वकिलांचा युक्तीवाद
त्यानंतर विशेष सरकारी वकील प्रदिप घरत यांनी युक्तीवाद सुरु केला. राज्यात सर्वांनाच बोलण्याचा अधिकार आहे. सरकार चुकीचे काम करत असेल तर त्यांना बोलणे यांत काही गैर नाही. पण राणा दाम्पत्या प्रकरण वेगळे आहे. त्यांनी सर्व सीमा ओलांडल्या होत्या आणि त्यांनी सरकारला चॅलेंज केले होते. सरकारचे लोकशाहीवर नियंत्रण असणे गरजेचे आहे. लोकशाहीमध्ये नागरी हक्कांना सुद्धा मर्यादा आहेत. राणा पती-पत्नीने सर्व मर्यादा ओलांडत चॅलेज केले. प्रार्थना म्हणणे हा प्रत्येकाचा अधिकार आहे. पण राणा प्रकरणात तपासात धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. पोलिसांनी १४९ नोटीस बजावली, कारण त्यांनी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत होता.
हनुमान चालीसा पठण करणे हा गुन्हा नाही पण पोलिसांनी मातोश्रीवर जाऊ नका, असे त्यांना वारंवार सांगितले. अशा परिस्थितीत आज्ञाधारक नागरिक काय निर्णय घेऊ शकतो? तो न घेता राणा पती पत्नींनी आक्रमक भूमिका घेतली, जी भूमिका टीव्ही चॅनलने दाखवली. आरोपींच्या वकीलांना लंडन येथे हनुमान चालीसा बोलले याबाबत सांगितले. जर कोणी बोलत असेल की माझ्या घराबाहेर हनुमान चालीसा बोलू नका तर नाही बोलली पाहिजे. पण जबरदस्तीने जावून परवानगी नसताना हनुमान चालीसा बोलणे हा गुन्हा आहे. सध्या राजकारणात हिंदू कार्ड खेळले जात आहे. धर्म हा संवेदनशील विषय आहे. हनुमान चालीसा पठण सरकार करू देत नाही असं चित्र उभे करू सरकार कसं हिंदूंच्या विरोधात काम करते असे जनमत बनवायचे होते.
म्हणून राजदोहाचा गुन्हा लावला …
“संपुर्ण महाराष्ट्र हाहाःकार माजला आहे हे सरकार म्हणजे राज्याला लागलेली साडेसाती आहे, सर्व ठिकाणी अशांत आहे, जेव्हा पासून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तेव्हा पासून राज्यावर संकटे आली आहेत . हे राज्याला लागलेले ग्रहण संपवण्याकरता हजारोंच्या संख्येने मातोश्री बाहेर जाऊन हनुमान चालीसा बोलणार आहोत”, हे वाक्य राणा दाम्पत्य बोलले होते यातून स्पष्ट होतं की त्यांनी सरकारला आव्हान दिले होते. म्हणून कलम १२४ अ नुसार देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राणा दाम्पत्यांवर गंभीर गुन्हे आहेत. आरोपींवर खोटे जातीचे प्रमाण पत्र सादर केले, असा आरोप आहे.
“हम मुंबई मे आएंगे आप अपनी पुरी ताकद लगाईये. पुलिस को हम बता देते है की अगर हमारे बीच कोई आया तो हम उसे करारा जबाब देंगे”, असं राणा दाम्पत्यांनी चॅनलवरुन मुलाखत देताना बोलले होते. हे सरकारला दिलेले आव्हान का समजू नये? अशी भडकाऊ वक्तव्ये राणी दाम्पत्य करत होते त्यामुळे त्यांना कलम १४९ प्रतिबंधात्मक कारवाईची नोटीस दिली होती. मातोश्रीवर जाणार शिवसैनिकांमध्ये किती दम आहे ते बघूच हे सरकारला आव्हान नाही का? हे कुठे तरी थांबले पाहिजे. यामुळेच राज्यातील शांतता भंग होईल. मुख्यमंत्र्यांचा उल्लेख एकेरी शब्दात केला गेला. एका चॅनलवर दिलेल्या मुलाखतीत राणा यांनी मुख्यमंत्र्यांना म्हटलं. असे वक्तव्य करणे तेही मुख्यमंत्र्यां विरोधात हे कोणते लक्षण आहे?
दरम्यान दोघेही राजकीय नेते आहेत राजकीय दबदबा आहे त्यांचा ते तपासात बाधा आणु शकतात त्यामुळे त्यांना तपास पुर्ण होईपर्यंत दोघांना जामिन देवू नये, अशी मागणी सरकारी वकिलांनी केली.