GunratnaSadavarteNewsUpdate : गुणरत्न सदावर्ते यांच्या पोलीस कोठडीसाठी तीन पोलीस ठाण्याचे पोलीस न्यायालयात , उद्या सुनावणी

मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांचा ताबा घेण्यासाठी तीन पोलीस ठाण्यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. कोल्हापूर आणि अकोला जिल्ह्यातील अकोट पोलिसांनी मुंबईतल्या गिरगाव कोर्टात अर्ज केला असताना आता मुंबईच्या गावदेवी पोलिसांनीही सदावर्तेंची कोठडी मागितली आहे. नवीन आरोप ठेवण्यात आल्यामुळे तपासासाठी गावदेवी पोलिसांना ४ ते ५ दिवसांची कोठडी हवी आहे. दरम्यान सदावर्ते यांच्यावतीने कोल्हापूर सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला असून त्यावर २१ एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे तर अकोट न्यालयात अटकपूर्व जमिनीवर उद्या सुनावणी होणार आहे.
दरम्यान पोलिसांच्या माहितीनुसार अॅड गुणरत्न सदावर्तेंच्या घरामध्ये नोटा मोजण्याच्या मशीनसह काही संशयास्पद कागदपत्रे आढळल्याने मुंबईतील गावदेवी पोलिसांनी पुन्हा एकदा पोलीस कोठडीची मागणी केली आहे. नोटा मोजण्याच्या मशिनमधून ८५ लाख रुपये मोजले गेले असल्याची माहिती सरकारी वकील प्रदीप घरत यांनी न्यायालयाला दिली. दरम्यान कोल्हापूर आणि अकोला जिल्ह्यातील अकोट पोलिसांनीही कोठडीची मागणी केली आहे. उद्या सदावर्तेंना कोर्टात हजर केले जाणार असून कोठडी कुणाला मिळणार, याचा निर्णय होईल. दरम्यान, अन्य ३ आरोपींना आज न्यायालयाने २२ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.
सरकारी वकिलांनी कोर्टात दिलेल्या माहितीनुसार अॅड सदावर्ते यांनी एसटी कर्मचा-यांकडून पैसे गोळा करून परळ, भायखळा इथं मालमत्ता खरेदी केल्या आहेत. भायखळ्यात त्यांनी अगदी काही महिन्यांपूर्वी एक गाळा विकत घेतला असून त्यावर सदावर्तेंची मुलगी झेन, सदावर्ते, पत्नी जयश्री पाटील अशा सगळ्यांची नावे आहेत.
अकोट न्यालयात अटकपूर्व जमिनीवर उद्या सुनावणी
दरम्यान अकोला जिल्ह्यातील अकोट न्यायालयातही अॅड सदावर्ते व त्यांची पत्नी जयश्री पाटील यांची कोठडी वाढणार की त्यांना जामीन होणार हे उद्या ठरणार आहे. यासंदर्भात त्यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर उद्या सुनावणी होत आहे. एसटी कर्मचाऱ्यांकडून पैसे गोळा केल्याप्रकरणी अकोट शहर पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील दोन आरोपी न्यायालयीन कोठडीत आहे. तर उर्वरित दोन आरोपी ऍड. गुणरत्न सदावर्ते आणि जयश्री पाटील यांनी अकोट न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी न्यायालयात धाव घेतली आहे.