MumbaiNewsUpdate : गुणरत्न सदावर्ते यांचा कोठडीतील मुक्काम दोन दिवस वाढला…न्यायालयात नेमके काय झाले ?

मुंबई : शरद पवार यांच्या ‘सिल्व्हर ओक’ बंगल्यावरील हल्ला बोल आंदोलनानंतर एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. कारण गिरगाव कोर्टाने सदावर्ते यांना आणखी दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे सदावर्ते यांचा कोठडीतील मुक्काम १३ एप्रिलपर्यंत वाढला आहे. पोलिसांनी यावेळी ११ दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती परंतु न्ययालयाने दोन्हीही बाजूचा युक्तिवाद ऐकून दिन दिवसांची कोठडी मंजूर केली. दरम्यान सातारा पोलिसही त्यांच्याकडे दाखल करण्यात आलेल्या एका गुन्ह्यात अटक करण्यासाठी न्यायालयात दाखल झाले होते.
दरम्यान आज न्यायालयात सरकारी वकील प्रदीप घरत यांनी पोलिसांची बाजू मांडताना त्यांनी सदावर्ते यांच्याबद्दल अनेक खुलासे केले. तर सदावर्ते यांची बाजू मांडणारे वकील गिरीश कुलकर्णी यांनी सर्व आरोप खोटे असल्याची भूमिका मांडली. याप्रकरणी प्रचंड युक्तीवाद झाला. अखेर दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने सदावर्ते यांना आणखी दोन दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली.
पोलिसांच्या माहितीनुसार …
पोलिसांच्या तपासाचा हवाला देताना सरकारी वकील घरात म्हणाले कि , शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक बंगल्यावर हल्ला करण्याआधी एक बैठक झाली होती. या बैठकीत सिल्व्हर ओक येथे हल्ला करण्याचे ठरले होते. अभिषेक पाटील नावाचा एक एसटी कर्मचारी सदावर्ते यांच्या संपर्कात होता. त्याने फोन करुन काही पत्रकारांना बोलावले. त्यावेळी युट्युब चॅनलचे देखील पत्रकार होते. याप्रकरणी आणखी चार जणांचा ताबा पाहिजे. तसेच एक जण फरार आहे. एमजेटी मराठी न्युज चॅनलचा चंद्रकांत सूर्यवंशी नावाचा पत्रकार सदावर्ते यांच्या संपर्कात होता. त्याने काही व्हिडिओ डिलीट केले आहेत. या पत्रकाराचे आणि सदावर्ते यांचे सकाळी साडेदहा वाजेपासून व्हाट्सअॅप चॅट आहेत. या दोघांमध्ये व्हाट्सअॅप कॉल झाले. तर एक फोन नागपूर येथे करण्यात आला. तो फोन नेमका कुणाला करण्यात आला त्याचं नाव आता आम्ही कोर्टात सांगू शकत नाही.
न्यायालयात काय झाले ?
घरत पुढे म्हणाले कि , काहीजण यामागे आहेत जे वेस्टेड कारणाकरता सपोर्ट करतायेत. त्यांना गेल्या सहा महिन्यांपासून पैसे कुठून येतायेत याचा तपास करायचा आहे. पोलिसांच्या माहितीनुसार प्रत्येक एसटी कर्मचाऱ्याकडून ५३० रुपये गोळा केले गेले. हि रक्कम जवळपास १ कोटी ८० लाख रुपये इतकी मोठी रक्कम आहे. या पैशांचे इतरही काही लाभार्थी आहेत. हे तपासात समोर आले आहे. सदावर्ते यांचा एक फोन सापडत नाही. त्यात अनेक महत्वाच्या गोष्टी दडल्या आहेत. तो मोबाईल ३१ मार्च २०२२ पासून मिसिंग आहे. तो मोबाईल आणि सिम कार्ड जप्त करायचे आहे. सदावर्ते हे नागपूर मध्ये कोणाच्या तरी सतत संपर्कात होते. घटनेच्या दिवशी सकाळी ११.३५ मिनिटांनी फोन केला गेला होता. दुपारी १.३८ वाजता नागपूरच्या नंबरवर मॅसेज करुन सांगितले गेले की पत्रकार पाठवा. १२ एप्रिलला बारामतीत जायचे हा फक्त एक भ्रम तयार केला गेला होता. दुपारी २.४५ वाजता इलेक्ट्रॉनिक्स मीडिया पत्रकारांना कळवले गेले. या दरम्यान सदावर्ते मुद्दाम या घटनेच्या वेळेस न्यायालयाला गेलेले होते.
बॅनरवर सदावर्ते पती पत्नीचा फोटो
पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत सिल्व्हर ओक बंगला परिसरात रेकी केल्याच्या आरोपवरून ४ जणांना अटक करण्यात आली आहे. तर आणखी एकजण फरार आहे. पोलिसांच्या तपासानुसार ताजुद्दीन शेख याने मॅसेज केले होते. या आंदोलनासाठी ‘सावधान शरद सावधान ‘ असे एक बॅनर बनवले गेले होते. या बॅनरवर सदावर्ते पती पत्नीचा फोटो आहेत. आमदारांना १लाख पेन्शन आणि कामगारांना१६०० पेन्शन हा मॅसेज फिरवला गेला. अभिषेक पाटील याने शरद पवारांच्या बंगल्याची रेकी केली. याप्रकरणी पोलिसांनी अभिषेक पाटील, कृष्णा कोरे, मोहम्मद ताजुद्दीन, मंदाकिनी पवार या आरोपींना अटक केली. सच्चिदानंद पुरी यांचे देखील नाव तपासात समोर आले आहे. दरम्यान सदावर्तेंचा मोबाईल फोन शोधायचा आहे आणि १ कोटी ८० लाख रुपये कोणी कसे गोळा केले, ते पैसे कोणी कोणी वापरले याचा तपास करायचा आहे. या तपासासाठी कोर्टाने ११ दिवसांची पोलीस कोठडी द्यावी, अशी मागणी सरकारी वकिलांनी केली.
सदावर्तेंचे यांचे वकील गिरीश कुलकर्णी यांचा युक्तीवाद
दरम्यान सदावर्ते यांच्यावर केलेले आरोप साफ चुकीचे आहेत. ज्या फोन आणि सीमकार्डबाबत पोलीस बोलत आहेत त्या सीमकार्डची वॅलिडिटी ३१ मार्चपर्यंत होती. म्हणून त्या दिवसापर्यंतच फोन वापरला आणि त्यानंतर तो फोन देखील वापरण्यात आला नाही. प्रत्येक एसटी कर्मचाऱ्याकडून ५३० रुपये गोळा केले हे खरे आहे. पण ते त्यांच्या कामाकरताच गोळा केले गेले. तशी पावती सर्वांना दिली गेली आहे.
तुम्ही पत्रकारांना बोलावले गेले याबाबत बोलत आहात मग पोलिसांना जर आधीच माहिती होती तर पोलिसांनी सुरुवातीलाच बंदोबस्त का लावला नाही? एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले, काय नुकसान झाले? त्यादिवशी कोणताच गुन्हा घडला नाही. कामगारांनी आपले आंदोलन केले. धक्काबुक्की झाली. सिल्व्हर ओकवर आंदोलन केले आणि चप्पल फेकली म्हणून फक्त गुन्हा दाखल करण्यात आलाय. एमजेटीच्या चंद्रकांत सूर्यवंशी याच्याशी फोनवर बोलणे झाले ते मोर्चा बद्दल बोलणे झाले. तसेच अनेक पत्रकारांनीदेखील फोन केला होता. आंदोलक गेले आणि त्यांनी गेटवर चप्पल फेकल्या आहेत. या आंदोलनात कोणीही जख्मी झाले नाही.
नागपुरचा फोन हा केवळ हवेतला आरोप…
नागपूरमधील एका व्यक्तीशी बोलणे झाले आहे. पण कोणाशी बोलणे झाले आहे हे शोधू शकले नाहीत, असे कधी होते का? असा प्रश्न गिरीश कुलकर्णी यांनी उपस्थित केला. त्यावर लगेच सरकारी वकील प्रदीप घरत यांनी उत्तर दिलं. नागपूरमध्ये कोणाशी बोलणं झालंय याची माहिती आम्ही दिलीय. फक्त नाव घेता येत नाही असं कोर्टाला सांगितलं आहे, असं घरत यांनी सांगितल. नागपुरचा फोन हा केवळ हवेतला आरोप आहे. पैसे गोळा केला गेला याबाबतदेखील माहिती पूर्ण नाही. पोलीस कधी दीड कोटी तर कधी १ कोटी ८० लाख घेतल्याचे बोलत आहेत. स्पॉटवर कोणालाही इजा झाली नाही. आंदोलकांनी कोणालाही इजा केली नाही. सोबतच फक्त चप्पलफेक केली. ज्याला इजा करायची असं ते म्हणतायत त्याला इजा देखील केली नाही. मग हे म्हणणे कसं बरोबर आहे की हे षडयंत्र आहे. ही कॉन्पीरसी होऊ शकत नाही.
आपल्या युक्तिवादात गिरीश कुलकर्णी पुढे म्हणाले कि , कोणी पैसे दिले त्यांची काही तक्रारच नाही. त्यामुळे मी त्या मुद्द्यात जात नाही. याप्रकरणी कलम ३५३ लावण्यात आला आहे. पोलीस कस्टडीची गरज नाही. कोणी कोणाला मारले काहीच माहिती नाहीय. हे खरे नाही का की रिटायर्ड राजकारणी लाख रुपये कमवतो आणि सामान्य माणसाला कमी पैसे मिळतायत. हेच तर माझे क्लायंट बोलत आहेत. शरद पवारांकडे गेलो कारण त्यांनी हे सरकार बनवले आहे , असे सदावर्तेंच्या वकिलांनी सांगितले . या दरम्यान चार कर्मचाऱ्यांची पोलीस कोठडी मागितली. मात्र संबंधित कर्मचाऱ्यांना कोर्टात हजर न केल्याने त्याबाबत निर्णय घेणार नसल्याचे कोर्टने स्पष्ट केले. शेवटी सरकारी वकील प्रदीप घरत म्हणाले कि , या घटनेत दोन पोलीस जख्मी झाले आहेत. त्यापैकी एकावर अजूनही उपचार सुरु आहेत. शेवटी दोन्हीही बाजू ऐकल्यानंतर न्ययालयाने दोन दिवसांची कोठडी मंजूर केली.