घ्या आता नवीन सर्व्हे , भाजपाच नव्हे, तर एनडीएलादेखील बहुमताचा आकडा गाठता येणार नाही

निवडणूक जसजशी जवळ येत आहे तसे तसे अनेक सर्वे मतदारांना बघायला आणि वाचायला मिळणार आहेत . काल इंडिया टीव्ही आणि न्यूज १८ यांनी मोदी पुन्हा पंतप्रधान होतील आणि भाजप व एनडीए ला सर्वाधिक जागा मिळतील असा अंदाज वर्तविला नाही तोच आता एबीपी-सी व्होटरच्या सर्वेक्षणातून यंदाच्या निवडणुकीत भाजपाच नव्हे, तर एनडीएलादेखील बहुमताचा आकडा गाठता येणार नाही, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यंदा एनडीएला 267 जागा मिळतील, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर यूपीएला 142 आणि इतरांना 134 जागा मिळण्याचा अंदाज आहे.
गेल्या निवडणुकीत एकट्या भाजपानं 272 चा जादुई आकडा ओलांडला होता. मात्र गेल्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत एनडीएला 51 जागा कमी मिळतील, असा अंदाज सर्वेक्षणातून व्यक्त करण्यात आला. त्यामुळेच एनडीए बहुमतापासून किंचित दूर राहू शकतं. एनडीएला सर्वाधिक फटका उत्तर भारतात बसू शकतो. उत्तर भारतातल्या सहा राज्यांमध्ये भाजपानं मित्र पक्षांसह गेल्या निवडणुकीत तब्बल 178 जागा जिंकल्या होत्या. त्यामध्ये यंदा 57 जागांची घट होऊ शकते. त्यामुळे हा आकडा 121 वर येईल. उत्तर भारतात उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड आणि झारखंडचा समावेश आहे.
भाजपासह एनडीएला उत्तर प्रदेशासह पाच राज्यांमध्ये मोठा फटका बसण्याची शक्यता असताना काँग्रेसप्रणित यूपीएला फायदा होत असल्याचं चित्र आकडेवारीतून समोर आलं आहे. गेल्या निवडणुकीत उत्तर भारतातील सहा राज्यांमध्ये यूपीएला अवघ्या 12 जागा मिळाल्या होत्या. त्यात यंदा वाढ होऊन तो आकडा 34 वर जाईल. उत्तर भारतात काहीसं यश मिळत असल्यानं यूपीएचं राष्ट्रीय पातळीवरील संख्याबळ वाढू शकतं. यंदा यूपीएला 142 जागा मिळू शकतात. गेल्या लोकसभेच्या तुलनेत यूपीएच्या जागा 47 नं वाढणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.