IndiaNewsUpdate : मोठी बातमी : ज्येष्ठ काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांच्यासह सहा जणांना एक वर्ष कारावासाची शिक्षा

इंदूर : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह, माजी खासदार प्रेमचंद गुड्डू यांच्यासह सहा आरोपींना २०११ मधील मारहाण प्रकरणात प्रत्येकी एक वर्ष कारावास आणि पाच हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावण्यात आली आहे. उज्जैन येथे ही घटना घडली होती. इंदूर येथील विशेष न्यायालयाने या खटल्यात ११ वर्षांनंतर शनिवारी निकाल दिला. दरम्यान, दिग्विजय सिंह आणि गुड्डू हे शिक्षेला उच्च न्यायालयात आव्हान देणार आहेत. तशी माहिती त्यांच्या वकिलांकडून देण्यात आली.
उज्जैन येथे १७ जुलै २०११ रोजी भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी दिग्विजय सिंह यांना काळे झेंडे दाखवले होते. दिग्विजय सिंह यांचा ताफा जात असताना तीव्र निदर्शने करण्यात आली होती. दिग्विजय यांच्या वादग्रस्त विधानांचा निषेध करण्यासाठी ही निदर्शने केली गेली होती. यावेळी दिग्विजय सिंह आणि माजी खासदार प्रेमचंद गुड्डू यांच्या समक्षच काँग्रेस आणि भाजयुमो कार्यकर्त्यांमध्ये वाद भडकला होता. त्या वादाचे पर्यवसन हाणामारीत होऊन भाजयुमो कार्यकर्ता रितेश खाबिया याला बेदम मारहाण करण्यात आली होती. याप्रकरणी लोकप्रतिधींवरील दाव्यांसाठीच्या इंदूर येथील विशेष न्यायालयात खटला चालला व शनिवारी न्यायालयाने निकाल सुनावला.
न्यायालयाने दिग्विजय सिंह, प्रेमचंद गुड्डू यांच्यासह सहा आरोपींना दोषी ठरवत प्रत्येकी एक वर्ष कारावासाची शिक्षा ठोठावली तर तीन आरोपींची सबळ पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली. आरोपींनी प्रत्येकी पाच हजार रुपये दंड भरल्यानंतर २५-२५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर सर्वांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. सर्व आरोपींना सुनावण्यात आलेली शिक्षा तीन वर्षांपेक्षा कमी असल्याने त्यांना जामीन मिळाला असल्याचे सरकारी वकील विमलकुमार मिश्रा यांनी सांगितले.