IndiaNewsUpdate : पराभवानंतरचे कवित्व , पंजाबच्या पराभवावर सोनिया गांधी यांचे मोठे वक्तव्य …. !!

नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी एका उच्चस्तरीय बैठकीत पंजाब विधानसभा निवडणुकीतील पक्षाच्या खराब कामगिरीची संपूर्ण जबाबदारी घेतली असल्याचे वृत्त आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकीशी संबंधित महत्त्वाच्या निर्णयांमध्ये गुंतलेली त्यांची मुले, राहुल आणि प्रियंका यांच्यावर पंजाब निवडणुकीच्या अपयशाचे खापर फोडले जात असल्याने स्वतः सोनिया गांधी यांनी हि जबाबदारी स्वीकारल्याचे सांगण्यात येत आहे. ऐन निवडणुकांच्या तोंडावर कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या जागी नवा मुख्यमंत्री आणणे आणि नवज्योतसिंग सिद्धू यांची शेवटच्या क्षणी राज्य पक्षप्रमुख म्हणून नियुक्ती करणे यासारख्या ‘आत्मघाती’ निर्णयानंतर, काँग्रेस पक्ष यावेळी 77 जागांपैकी केवळ 18 जागांवर घसरला परिणामी काँग्रेसला राज्याच्या सत्तेतून बाहेर पडावे लागले अशी काँग्रेस नेत्यांची धारणा आहे. त्यामुळे पराभवानंतरचे कवित्व काँग्रेसमध्ये चालू असल्याचे चित्र आहे.
पंजाबसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या खराब कामगिरीवर चर्चा करण्यासाठी काँग्रेस कार्यकारिणीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत सोनियांचे हे वक्तव्य समोर आले. या बैठकीत पक्षाचे ६० हून अधिक प्रमुख नेते सहभागी झाले होते. मिळालेल्या माहितीनुसार, बैठकीदरम्यान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि असंतोषांच्या कथित G-23 गटाचे प्रमुख सदस्य गुलाम नबी आझाद यांनी विचारले की पंजाबमधील खराब कामगिरीसाठी कोण जबाबदार आहे? मिळालेल्या माहितीनुसार, गांधी भावंडांवर (मीटिंगमध्ये उपस्थित असलेल्या राहुल आणि प्रियंका) निशाणा साधताना आझाद यांनी , निवडणुकीच्या फक्त तीन महिने आधी, अमरिंदर सिंग यांच्या जागी चरणजीत सिंग चन्नी यांचा निर्णय कोणी घेतला? नवज्योत सिद्धू यांची प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती कोणी केली, असे प्रश्न उपस्थित केले.
आझाद यांनी मानले सोनियांचे आभार
दरम्यान गुलाम नबी आझाद यांच्या प्रश्नांचे उत्तर देताना , पंजाबचे सर्व निर्णय मी घेतलेले आहेत आणि त्याची संपूर्ण जबाबदारी आपण स्वतः घेत असल्याचे सोनिया म्हणाल्या. त्यावर काँग्रेसच्या एका सूत्राने सांगितले की, “जबाबदारी स्वीकारल्याबद्दल आझाद यांनी सोनियांचे आभार मानले. हे खुलासे काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या गोंधळाचे प्रतिबिंबित करतात, ज्यामुळे ताज्या निवडणुकीतील पराभवानंतर गांधी कुटुंबाच्या नेतृत्वावर दबाव वाढला आहे. काँग्रेसच्या असंतुष्ट गटातील दोन सदस्य कपिल सिब्बल आणि मनीष तिवारी यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीदरम्यान पक्ष नेतृत्वावर जाहीरपणे टीका केली आहे.
‘घर की काँग्रेस’ नको, तर ‘सबकी काँग्रेस’ हवी…
गांधी घराण्याने काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वापासून वेगळे व्हावे आणि दुसऱ्याला संधी द्यावी, असे सिब्बल म्हणाले होते, तर त्यांना ‘घर की काँग्रेस’ नको, तर ‘सबकी काँग्रेस’ हवी असल्याचेही ते म्हणाले. राहुल गांधींवर टीका करताना ते म्हणाले होते, ते पक्षाचे अध्यक्ष नसून सर्व निर्णय घेतात. गुलाम नबी आझाद आणि आनंद शर्मा यांच्यासारख्या ‘पूर्णवेळ’ नेत्यांना काँग्रेसमध्ये फूट पडू द्यायची नाही कारण त्यांना वाटते की यामुळे पक्ष कमकुवत होईल आणि भाजपला मदत होईल. ते पक्षातील अंतर्गत सुधारणांचा पुरस्कार करत आहेत ज्यात निर्णय गांधी घराण्याभोवती केंद्रित न राहता विकेंद्रित केले पाहिजेत, म्हणजेच महत्त्वाच्या निर्णयांमध्ये इतर लोकांचीही भूमिका असली पाहिजे. दुसरीकडे, सिब्बल आणि मनीष तिवारी यांच्यासारखे नेते काँग्रेस नेतृत्वाकडून विरोध झाल्यास गरज पडल्यास कठोर पावले उचलण्यास अनुकूल असल्याचे सांगितले जाते.