GoaNewsUpdate : गोव्याच्या नव्या मुख्यमंत्र्याच्या नावावर शिक्कामोर्तब

पणजी : भारतीय जनता पक्षाच्या आमदारांच्या बैठकीत पुन्हा एकदा प्रमोद सावंत यांच्याकडेच गोव्याच्या मुख्यामंत्रीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यामुळे सावंत हेच गोव्याचे पुढील मुख्यमंत्री असतील हे निश्चित झाले आहे. गोव्यातील भाजपचे केंद्रीय निरीक्षक आणि केंद्रीय मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी सांगितले की, विश्वजित राणे यांनी सावंत यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला होता.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत 20 जागा जिंकून भाजप सर्वात मोठा राजकीय पक्ष म्हणून उदयास आल्याच्या 11 दिवसांनंतर ही बैठक झाली. भाजपचे केंद्रीय निरीक्षक नरेंद्रसिंग तोमर आणि एल मुरुगन हे भाजप विधिमंडळ पक्षनेते निवडीच्या प्रक्रियेवर देखरेख ठेवण्यासाठी आज दुपारी येथे दाखल झाले.
भाजपने एमजीपीचे दोन आमदार आणि तीन अपक्ष आमदारांचे समर्थन मिळवले आहे. यामुळे नव्या विधानसभेत संख्याबळाच्या बाबतीत आरामदायी स्थिती आहे. सावंत यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर नवीन सरकार स्थापनेचा दावा करण्यासाठी भाजप नेते आणि आमदार राज्यपाल पीएस श्रीधरन पिल्लई यांची राजभवनात भेट घेणार असल्याचे वृत्त आहे.