MaharashtraNewsUpdate : खा. संभाजी राजे यांच्या सर्व मागण्या मान्य , उपोषणाची सांगता…
मुंबई : मराठा आरक्षण आणि इतर मागण्यांसाठी राज्यसभेचे खासदार संभाजीराजे यांनी गेल्या तीन दिवसांपासून आझाद मैदानावर सुरु केलेले उपोषण आज लहान मुलाच्या हाताने ज्यूस पिऊन सोडले आहे. दरम्यान त्यांनी केलेल्या सर्व मागण्या राज्य सरकारने मान्य केल्या असल्याची माहिती राज्याचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. यावेळी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची उपस्थिती होती. त्यांच्या सर्व मागण्यांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चर्चा करून त्यांच्या ज्या ज्या मागण्या मान्य केल्यात त्याची माहिती देऊन शिंदे यांनी देऊन संभाजीराजेंना उपोषण सोडण्याची विनंती केली. त्यानंतर संभाजीराजेंनी उपोषण सोडण्याचा निर्णय घेतला.
यावेळी खा. संभाजीराजे म्हणाले कि , मी खुश आहे. पहिल्यांदा मी सर्व मराठा संघटना यांचे आभार मानतो. आपण केवळ महाराष्ट्र पुरते मर्यादित नाही देशभर आपण संदेश देऊ. मराठा आरक्षणाचा विषय मी मांडला आणि इतर खासदारांनी त्या नंतर तो मांडला. मराठा आणि बहुजन समाजाचे आभार मानतो. उपोषणाचा निर्णय मी कोणाला ही न सांगता घेतला. उपोषण करणार असे वडिलांनाही सांगितले नाही, त्याच्या जवळच्या सहकाऱ्यांना हे सांगितले पण आंदोलनाच्या दिवशी सकाळी मी त्यांना सांगितले. आई दरोरोज फोन करून लिंबू शरबत घ्या असे सांगत होत्या, असे सांगताना संभाजीराजे भावूक झाले. शाहू महाराज हे केवळ कोल्हापूर पुरते नाही आहेत. अनेक लोकांनी टीका केली मी खासदार झाल्यावर. पण मी समाजासाठी सगळे केले. मराठा समाजाचा विषय संसदेमध्ये कोणी नाही मांडला, केवळ मी मांडला, असे म्हणत संभाजीराजेंनी सर्वांचे आभार मानले.
यावेळी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले कि , आज मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली. शिष्टमंडळासमोर चर्चा झाली.प्रत्येक मुद्दयांवर चर्चा झाली. बाकी काही ठेवायचं नाही असा निर्णय आम्ही घेतला.यापूर्वी अनेक आंदोलनं आपण केली मात्र अशा परिस्थितीत सरकार काही गोष्टी देऊ शकतं यासाठी प्रयत्न करत आहे. आरक्षणाचे फायदे इतर समाजाला दिले जातात तसे मराठा समाजाला आरक्षण दिले पाहिजे यावर चर्चा झाली.
सरकारकडून मागण्यांपेक्षा जास्तीचा विचार
१. सारथीचे कौशल्यविकासाचे कार्यक्रम एका महिन्यात सुरू करण्यात येतील.
२. सारथीचं व्हिजीन डॉक्युमेंट तज्ज्ञांचा सल्ला घेऊन ३० जून २०२२ पर्यंत पूर्ण तयार करण्यात येईल.
३. सारथीमधील सर्व रिक्त पदं १५ मार्च २०२२ पर्यंत भरण्यात येतील.
४. सारथीच्या ८ उपकेंद्रांसाठी जमीन देण्याचा प्रस्ताव १५ मार्च २०२२ पर्यंत मंत्रिमंडळासमोर सादर करण्यात येईल.
५. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला चालू आर्थिक वर्षात १०० कोटीपैकी ८० कोटी प्राप्त झालेत. उर्वरित २० कोटी आणि पुरवणी मागणीद्वारे अतिरिक्त १०० कोटी रुपये निधी उपलब्ध करुन देण्यात येईल.
६. व्याजपरताव्यासंदर्भात कागदपत्रांची पूर्तता करून प्रस्ताव प्राप्त झाल्यास तातडीने व्याजपरतावा देण्यात येईल. कर्ज मिळण्यात ज्या अडचणी येत आहेत त्याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल.
७. परदेशात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कर्जावरील व्याज परताव्याबाबत शासन धोरण ठरवेल.
८. व्याज परताव्यासाठी कर्जाची मुदत १० लाख होती, ती आता सरकारने १५ लाख रुपये केली आहे.
९. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ व इतर महामंडळावर पूर्णवेळ व्यवस्थापकीय संचालक १५ मार्च २०२२ पर्यंत नियुक्त करण्यात येईल. तसेच संचालक मंडळ आणि इतर कर्मचारी देखील नियुक्त केलं जाईल.
१०. जिल्ह्यात स्थापन करावयाच्या वसतिगृहांची यादी उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून आजच उपलब्ध करून तयार वसतिगृहांचं उदघाटन गुडीपाडव्याच्या दिवशी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात येईल.
११. कोपर्डी खून खटल्यात दाखल अपिलाची सुनावणी तातडीने घेण्याबाबत महाधिवक्त यांना विनंती करून २ मार्च २०२२ रोजी मेंशन करण्यात येईल.
१२. पुनर्विचार याचिकेची सुनावणी खुल्या न्यायालयात घेण्याबाबत १५ दिवसाच्या आत सर्वोच्च न्यायालयात अर्ज करण्यात येईल.
१३. मराठा आंदोलकांवर दाखल गुन्हे मागे घेण्याच्या कार्यवाहीबाबत गृहमंत्रालयाकडून प्रत्येक महिन्यात आढावा बैठक घेण्यात येईल. त्यात प्रकरणनिहाय आढावा घेण्यात येईल. तसेच जे गुन्हे मागे घेण्यात आलेत परंतू न्यायालयात आहेत त्याचाही प्रकरणनिहाय आढावा घेण्यात येईल.
१४. मराठा आंदोलनात मृत पावलेल्या वारसदारांना एसटी महामंडळात ११ लोकांना नोकऱ्या मिळाल्यात. उर्वरित लोकांना तातडीने कागदपत्रांची पुर्तता करून नोकरी देण्याचा निर्णय शासनाने घेतला.
१५. अधिसंख्य पदं निर्माण करून त्यांच्या नियुक्तीबाबचा प्रस्ताव एका महिन्याच्या आत मंत्रिमंडळासमोर ठेवण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.