RussiaUkrainWarUpdate : रशिया -युक्रेन युद्धाच्या आतापर्यंतच्या महत्वाच्या घडामोडी …

नवी दिल्ली : रशियाने पहिल्या दिवशी युक्रेनवर २०३ हल्ले करून ८३ लक्ष्ये उद्ध्वस्त केल्याचा दावा रशियाने केला आहे. याबाबत रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की त्यांच्या सैन्याने युक्रेनमधील ११ एअरफील्डसह ७० हून अधिक लष्करी तळ नष्ट केले आहेत. रशियाच्या संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते इगोर कोनाशेन्कोव्ह म्हणाले की, रशियन सैन्याने केलेल्या हल्ल्यांमुळे युक्रेनमधील ७४ लष्करी सुविधा नष्ट झाल्या आहेत. युक्रेनचे लष्करी हेलिकॉप्टर आणि चार ड्रोनही पाडण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
अमेरिकेने स्पष्ट केली आपली भूमिका
दरम्यान युक्रेनवरील हल्ल्यामुळे पाश्चिमात्य देश हैराण झाले असून रशियावर अनेक कठोर निर्बंध लादण्यात आले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनी व्हाईट हाऊसमधून केलेल्या भाषणात आणखी काही निर्बंधांची घोषणा केली, की Sberbank आणि VTB सारख्या मोठ्या बँकांसह आणखी चार मोठ्या बँकांना या निर्बंधांचा फटका बसेल. बिडेन यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, ‘पुतिन हे आक्रमक आहेत. पुतिन यांनी युद्ध निवडले. त्यामुळे अमेरिकेने रशियाविरूद्ध कठोर आर्थिक निर्बंध जाहीर केले, परंतु रशियन सैन्याविरूद्ध युद्ध करण्यासाठी युक्रेनमध्ये अमेरिकन सैन्य पाठवण्यास स्पष्टपणे नकार दिला. रशियाने अमेरिकेवर हल्ला केल्यास अमेरिका प्रत्युत्तर देण्यास तयार आहे, असे सांगून त्यांनी ‘नाटो’ सैन्याला मदत करण्यासाठी आणखी सैन्य पाठवण्याची घोषणाही त्यांनी केली. युक्रेन संकटावर व्हाईट हाऊसमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांना जेव्हा विचारण्यात आले की, रशियाच्या हल्ल्यावर भारत पूर्णपणे अमेरिकेच्या पाठीशी उभा आहे का? तर याला उत्तर देताना ते म्हणाले कि , भारतासोबत चर्चा सुरू आहे. आम्ही भारताशी बोलत आहोत. प्रकरण पूर्णपणे सुटलेले नाही.
इंग्लंड आणि फ्रान्सचा रशियाला इशारा
दरम्यान रशियावर नवीन निर्बंधांची रूपरेषा मांडताना, ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी गुरुवारी घोषणा केली की, ते देशातील एरोफ्लॉट विमान कंपनीवर बंदी घालतील. जॉन्सन पुढे म्हणाले कि , “या व्यापार निर्बंधांमुळे रशियाच्या लष्करी, औद्योगिक आणि तांत्रिक क्षमतेला पुढील काही वर्षे बाधा येईल.” तर फ्रान्सचे परराष्ट्र मंत्री जीन-यवेस ले ड्रियान यांनी जगभरातील देशांनी या युद्धातून आण्विक धोक्याची भीती व्यक्त केली आहे. त्यांनी सांगितले की पुतिन जेव्हा अण्वस्त्रे वापरण्याची धमकी देत आहेत, तेव्हा त्यांना हे समजून घेणे आवश्यक आहे की नाटो देखील एक अण्वस्त्र युती आहे.
अमेरिकेचे म्हणणे आहे की, ते युक्रेनला पूर्णपणे पाठिंबा देत आहेत आणि युक्रेनला मदत करू इच्छित आहेत . यूएस हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हच्या स्पीकर नॅन्सी पेलोसी यांच्या म्हणण्यानुसार, या लढ्यासाठी युक्रेनला ६० कोटी डॉलर्सची संरक्षण शस्त्रे देण्याचा निर्णय अमेरिकेने घेतला आहे.
युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेसाठी भारताचे प्रयत्न
रशियन हल्ल्याच्या काही तासांनंतर, भारताने प्रमुख पक्षांमधील संवादाची गरज अधोरेखित केली आणि चर्चा शक्य होण्यासाठी मदत करण्यास आनंद होईल असे सांगितले. परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला यांनी गुरुवारी सांगितले की, भारत अमेरिका, रशिया आणि युरोपियन युनियनसह सर्व संबंधितांशी संपर्कात आहे. त्याचवेळी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी पुतीन यांच्याशी बोलून हिंसाचार त्वरित थांबवण्याचे आवाहन करून सर्व पक्षांना राजनैतिक संवाद आणि संवादाच्या मार्गावर परतण्यासाठी एकत्रित प्रयत्न करण्याचे आवाहन केले. या चर्चेच्या दरम्यान पुतिन यांनी पंतप्रधान मोदींना युक्रेनशी संबंधित अलीकडच्या घडामोडींची माहिती दिली. यावेळी युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांच्या, विशेषत: विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत भारताच्या चिंतेबद्दलही मोदींनी पुतीन यांना अवगत केले. यासोबतच त्यांचे सुरक्षित परतणे ही भारताची सर्वोच्च प्राथमिकता असल्याचे त्यांनी सांगितले.