चारा घोटाळा प्रकरणी लालू प्रसाद यादव दोषी

राष्ट्रीय जनता दल प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्या अडचणी वाढल्या आहेत. चारा घोटाळ्यातील पाचवे सर्वात महत्वाच्या डोरंडा ट्रेझरी प्रकरणी रांचीतील विशेष न्यायालयाने लालूप्रसाद यादव यांना दोषी ठरवले आहे. सीबीआयच्या विशेष न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.
१९९६ साली झालेल्या चारा घोटाळाप्रकरणी २६ वर्षांनंतर न्यायालयाने निकाल दिला आहे. या प्रकरणात १८ फेब्रुवारीला न्यायालय शिक्षा सुनावणार आहे. डोरंडा ट्रेझरीमधून १३९ कोटी रुपये अवैध पद्धतीने काढल्याप्रकरणात लालू प्रसाद यादव यांना कोर्टाने दोषी ठरवले असून या प्रकरणात इतर २४ जणांची कोर्टाने निर्दोष मुक्तता केली आहे.
लालूप्रसाद यादव यांना आतापर्यंत या घोटाळ्यासंबंधित ५ प्रकारणांमधील ४ प्रकरणी न्यायालयाने त्यांना दोषी ठरवले आहे. हे प्रकरण १९९६ साली समोर आले होते. हा घोटाळा उघडकीस आल्यानंतर लालू यांना बिहारच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामाही द्यावा लागला होता.
काय आहे दोरंडा प्रकरण?
१९९० ते १९९५ दरम्यान दोरंडा कोषागारातून बेकायदेशीरपणे १३९.३५ कोटी रुपये काढण्यात आले होते. हे चारा घोळयातील सर्वात मोठे प्रकरण आहे. याप्रकरणी १९९६ साली १७० आरोपींवर गुन्हा नोंदवण्यात आला होता. त्यामधील ५५ आरोपींचा मृत्यू झाला असून ७ आरोपी हे साक्षीदार बनले आहेत. तसेच दोन आरोपींनी आपला गुन्हा कबूल केला आहे. तर ६ आरोपी फरार आहेत. याप्रकरणातील एकूण ९९ आरोपींवर अद्यापही निर्णय येणे बाकी आहे.