MumbaiNewsUpdate : लता मंगेशकर यांच्या अंत्य संस्कारासाठी पंतप्रधान मुंबईत

मुंबई : प्रसिद्ध गायिका लता मंगेशकर यांचे आज रविवारी सकाळच्या सुमारास निधन झाले. त्या ९२ वर्षांच्या होत्या. कोरोनाची लागण झाल्यामुळे लता मंगेशकर यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयातउपचार चालू होते. त्यानंतर त्यांना न्यूमोनियाची देखील लागण झाली होती. त्यानंतर 30 जानेवारीला लता मंगेशकर या कोरोनामुक्त झाल्या होत्या. मात्र, अचानक त्यांची प्रकृती बिघडली आणि त्यांचे निधन झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या अंत्य संस्कारासाठी उपस्थित राहण्यासाठी ४ वाजता मुंबईत दाखल होणार होणार आहेत.
लता मंगेशकर यांना १९८९ मध्ये दादासाहेब फाळके पुरस्काराने तर २००१ मध्ये भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. त्यांनी विविध २० प्रादेशिक भाषेत ९०० हून अधिक हिंदी चित्रपटांची गाणी गायली आहेत.त्यांच्या निधनाबद्दल अनेक मान्यवरांनी आपली श्रद्धांजली अर्पण केली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, ”लताजींचे निधन माझ्यासाठी हृदयद्रावक आहे, जसे जगभरातील लाखो लोकांसाठी. भारतरत्न, लताजींचे कर्तृत्व अतुलनीय राहील.”
दरम्यान लता दिदींच्या जाण्यानं एका स्वर युगाचा अंत झाला, एक महान पर्व संपले. आमच्यावरचा मातृतुल्य आशीर्वाद हरपला अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तर लतादीदी मंगेशकर यांच्या निधनाने केवळ स्वर नाही, तर भारतीय संगीताचा आत्मा हरपला असल्याची भावना भाजप नेते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपली श्रद्धांजली व्यक्त करताना, महाराष्ट्रकन्येच्या निधनाने देशाची हानी, लतादिदींची उणीव भरुन निघणे अशक्य असल्याचे म्हटले आहे.