MaharashtraNewsUpdate : आमदार नितेश राणे यांना न्यायालयीन कोठडी, जेल नको म्हणून वकिलांचा अर्ज

कणकवली : शिवसैनिक संतोष परब यांच्यावरील हल्ला प्रकरणी भाजप आमदार नितेश राणे यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली दिवाणी न्यायालयाने आता १८ फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दरम्यान नितेश राणे यांना वैद्यकीय तपासणी नेत असताना त्यांची प्रकृती बरी असल्याने त्यांना सावंतवाडी कारागृहात नव्हे तर रुग्णालय दाखल करण्यात यावे, असा अर्ज त्यांच्या वकिलांनी कारागृह अधीक्षकांकडे दिला आहे.
न्यायालयातील सुनावणी संपल्यानंतर नितेश राणे आणि राकेश परब यांना वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात नेण्यात आले आहे. तर दुसरीकडे नितेश राणे यांच्या वकिलांनी काहीवेळापूर्वीच सत्र न्यायालयात नितेश राणे यांच्या जामिनासाठी अर्ज केला असून या जमीन अर्जावर शनिवारी सुनावणी होणार आहे.
पोलिसांनी केली होती ८ दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी
दरम्यान तपासाकरता वेळ कमी पडला आहे. तपासाची व्याप्ती मोठी आहे. राज्याबाहेर जाऊन देखील तपास करायचा आहे. आरोपीला पुण्याला नेऊन काही तपास करायचा आहे, काही आर्थिक व्यवहार झाले आहेत का याबाबतही तपास करायचा आहे. आणखी तपास करण्यास वेळ मिळावा, या करता किमान ८ दिवसांची पोलिस कोठडी द्यावी अशी मागणी सरकारी वकिलांकडून करण्यात आली. मात्र न्यायालयाने पोलिसांची मागणी फेटाळून लावत न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. २ फेब्रुवारी रोजी नितेश राणे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली दिवाणी न्यायालयात शरण अर्ज दाखल केल्यानंतर न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची म्हणजेच ४ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती.
निलेश राणे यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल
दरम्यान सिंधुदुर्ग कोर्टाबाहेर १ फेब्रुवारी रोजी सुनावणी संपल्यानंतर कोर्टाच्या आवारात हुज्जत घातल्या प्रकरणी निलेश राणेंसह भाजपच्या अन्य पाच जणांवर ओरोस पोलीस स्थानकात उशिरा गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. १८८, २६९, २७०, १८६ या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नितेश राणे यांच्या जामीनावरील सुनावणीनंतर न्यायालयाबाहेर जमाव करणे आणि पोलिसांशी हुज्जत घालून शांततेचा भंग करणे यावरून हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.