MaharashtraNewsUpdate : मास्क मुक्त महाराष्ट्र !! जाणून घ्या काय आहे वस्तुस्थिती…

पुणे : टास्क फोर्सने परवानगी दिल्यास महाराष्ट्र मास्क मुक्त होऊ शकतो अशा बातम्या आल्यानंतर महाराष्ट्र मास्क मुक्त होणार का ? अशा चर्चा सुरु झाल्या असून या चर्चेला उत्तर देताना करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील मास्कबंदी उठवली जाणार नसली तरी आगामी दिवसांमध्ये महाराष्ट्रातील करोना निर्बंधांमध्ये घट होऊ शकते, यादृष्टीने विचारविनिमय सुरु असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
दरम्यान राज्य मंत्रिमडळाच्या बैठकीत मास्कमुक्त महाराष्ट्र, अशी चर्चा झालीच नाही. मी केवळ एवढीच विनंती केली की, युरोपीय देशांमध्ये ज्याप्रमाणे कोरोना निर्बंध हटवण्यासंदर्भात निर्णय घेतले जात आहेत त्यावरुन आपल्याला बोध घेता येईल का, याचा विचार व्हावा. इंग्लंड, डेन्मार्क, हॉलंड आणि ब्रिटनमध्ये कोरोना निर्बंधांबाबत अनेक निर्णय घेण्यात आले आहेत. तेव्हा केंद्रीय टास्क फोर्स आणि राज्य टास्क फोर्सने हे निर्णय कोणत्या आधारावर घेण्यात आले याचा अभ्यास करावा. जेणेकरुन त्यामधून आपल्याला काही बोध घेता येईल. यामध्ये मास्कमुक्तीचा निर्णय नव्हे तर इतर निर्बंध कमी करता येतील का, याचा अभ्यास झाला पाहिजे. भारतीय वैद्यक संशोधन परिषदेला (ICMR) यासंदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी राज्याने विनंती करावी, अशी मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे केली. असून मुख्यमंत्र्यांनी या प्रस्तावाला संमती दिल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली.
या निमित्ताने बोलताना टोपे म्हणाले कि , गेल्या काही दिवसांमध्ये राज्यातील दैनंदिन रुग्णांची संख्या ४७ हजारावर पोहोचली होती. तो आकडा २५ हजारापर्यंत खाली आला आहे. याचा अर्थ रुग्णसंख्येत ५० टक्क्यांनी घट झाली आहे. राज्यात तिसऱ्या लाटेसाठी तयार करण्यात आलेले ९० ते ९२ टक्के बेडस रिकामे आहेत. अतिदक्षता विभाग, व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन या सुविधांची गरज लागणाऱ्या रुग्णांची संख्या अवघी एक टक्का इतकी आहे. त्यामुळे महाराष्ट्रात करोनाच्या तिसऱ्या लाटेचा पीक येऊन गेला आहे, असे म्हणता येईल. गेल्या काही दिवसांमध्ये मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर या भागात करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत होती, पण आता तशी परिस्थिती नाही. पण नाशिक, पुणे, नागपूर आणि ग्रामीण भागात करोना रुग्णांची संख्या वाढत आहे. पण तेथील रुग्ण प्राथमिक उपचारांमुळे बरे होत असल्याने फारशी चिंता करण्याचे कारण नाही. तसेच राज्यात करोनाच्या बीए-२ नव्या व्हेरिएंटचा शिरकाव झाला नसल्याची माहितीही राजेश टोपे यांनी यावेळी दिली.
महाराष्ट्रात मास्कबंदीचा कोणताही निर्णय नाही : अजित पवार
दरम्यान राज्यातील मास्क बंदी संदर्भातील वृत्त धादांत खोटे असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मास्क लावायचा नाही, अशी चर्चाच झाली नाही. माध्यमांनी यासंदर्भात नीटपणे माहिती घेऊन बातमी द्यायला हवी. सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरलाच पाहिजे, हा मुख्यमंत्र्यांसह आमचा आग्रह आहे. परदेशात इंग्लंडसारख्या देशांनी मास्क न वापरण्याचा निर्णय घेतला असेल तर तो त्यांना लखलाभ आहे, मला त्यावर बोलायचे नाही. आपल्या राज्यात तशाप्रकारची चर्चाही नाही. तसा कोणता निर्णयही झालेला नाही. कृपा करुन लोकांमध्ये कोणतेही गैरसमज निर्माण करु नयेत, असे अजित पवार यांनी म्हटले.