MaharashtraNewsUpdate : वाईन विक्री प्रकरणात भिडे सरकारला भिडले आणि न्यायाधिशालाही केली संपविण्याची भाषा … !!

सांगली : राज्य सरकारने किराणा दुकान आणि मॉलमध्ये वाईन विक्री करण्याचा निर्णय जाहीर झाल्यानंतर या निर्णयाविरोधात आता शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे आक्रमक झाले आहेत. राज्य सरकारचा हा निर्णय अत्यंत दुर्दैवी, समाजघातक आणि राष्ट्रघातक असून तो तातडीने मागे घ्यावा, अन्यथा उद्रेक अटळ आहे, असा इशारा भिडे यांनी आज दिला. दरम्यान या निमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत संभाजी भिडे यांनी न्यायाधीशांबाबतही वादग्रस्त वक्तव्यही केले. ‘लिव्ह इन रिलेशनशीप’चा निर्णय घेणाऱ्या न्यायाधीशांना संपवले पाहिजे, असे संभाजी भिडे यांनी म्हटले आहे.
या पत्रकार परिषदेत बोलताना भिडे पुढे म्हणाले की, महाभारत काळात यादवांच्यात प्रचंड भ्रष्टाचार, दुराचार, व्यसनाधीनता वाढली होती. त्यामुळे यादव एकमेकांचा जीव घेऊ लागले. त्यांना रोखण्यासाठी भगवान श्रीकृष्णांना नरसंहार करावा लागला. महाराष्ट्रात आता इतिहासाची पुनरावृत्ती होत आहे. पण आता श्रीकृष्ण नाहीत, हे लक्षात असू द्या. राज्य सरकारने घेतलेला निर्णय संतापजनक, राष्ट्रघातक आणि सर्वनाश करणारा आहे. या मंत्रिमंडळात राग येणारा कोणी भीम जिवंत नाही हे दुर्दैव आहे. राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात एकही मंत्री किंवा आमदार बोलत नाही हे लांच्छनास्पद आहे, अशी खरमरीत टीका भिडे यांनी केली आहे.
नाईट लाईफवरही संभाजी भिडे यांची टीका
मुंबईतील नाईट लाईफवरही संभाजी भिडे यांनी टीका केली. मुंबईला नाईट लाईफ देण्याची भाषा ही समाजाला व्यभिचाराकडे घेऊन जाणारी आहे. आज दारूला परवानगी दिली. उद्या गांजा आणि आफूलाही परवानगी द्याल, असे म्हणत भिडे यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली. वाईन विक्री निर्णय प्रकरणात संपूर्ण मंत्रिमंडळाने संभाजी महाराजांच्या पायाशी नतमस्तक होऊन माफी मागावी, अशी मागणीही संभाजी भिडे यांनी केली आहे.
शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्या नेतृत्वाखाली धारकऱ्यांनी आज सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांना निवेदन दिल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत आपला संताप व्यक्त केला. महाराष्ट्र सरकारने दुकाने आणि मॉलमध्ये वाईन विक्रीचा घेतलेला निर्णय अत्यंत दुर्देवी, समाजघातक, राष्ट्रघातक, नितीमत्तेचा, शीलाचा संहार करणारा आहे, असे मत भिडे यांनी निवेदनातून व्यक्त केले आहे.
थेट आंदोलनाचा इशारा
वाईनविक्रीच्या मुद्द्यावरून संभाजी भिडे यांनी आंदोलनाचाही इशारा दिला आहे. ‘उगवत्या पिढीला नितीमत्ता, शील, संस्कृती यापासून भरकटत विनाशाच्या दिशेकडे नेणारा हा राष्ट्रघातक निर्णय आहे. हा निर्णय तात्काळ मागे घेऊन छत्रपती संभाजी महाराजांच्या पायाशी मंत्रिमंडळाने सामूहिक क्षमा मागावी. राज्य सरकारने तातडीने हा निर्णय मागे न घेतल्यास समाजात संतापाची लाट उसळेल. शासनाने याची गांभीर्याने दखल घ्यावी, अन्यथा सरकारच्या निर्णयाविरोधात धारकरी रस्त्यावर उतरतील,’ असा इशारा भिडे यांनी दिला आहे.