BhaiyyuMaharajSucideCase : भैय्यू महाराज आत्महत्याप्रकरणी तिघांना प्रत्येकी ६ वर्षाची शिक्षा

इंदूर : प्रसिद्ध अध्यात्मिक संत भय्यू महाराज यांच्या आत्महत्ये प्रकरणी इंदूर येथील कोर्टाने आज निकाल सुनावला असून दोषी ठरविण्यात आलेल्या तीन आरोपींना प्रत्येकी सहा वर्षे कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. १२ जून २०१८ रोजी भय्यू महाराज यांनी डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याने खळबळ उडाली होती. घटनेनंतर सहा महिन्यांनी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली होती. साडेतीन वर्षे हा खटला चालला. यादरम्यान ३२ साक्षीदारांच्या साक्ष नोंदवण्यात आल्या असून सबळ पुराव्यांच्या आधारे आरोपींना दोषी ठरवण्यात आले आहे. या तिघांनी भय्यू महाराज यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे कोर्टात सिद्ध झाले आहे.
भय्यू महाराज यांना महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या दोन्ही राज्यांत त्यांना मानणारा मोठा वर्ग होता. त्यामुळे त्यांच्या आत्महत्येने मोठी खळबळ उडाली होती. याप्रकरणी पोलिसांनी भय्यू महाराज यांच्या आश्रमातील मुख्य सेवेकरी विनायक दुधाळे, चालक शरद देशमुख आणि केअरटेकर पलक पुराणिक या तिघांना अटक केली होती. घटनेनंतर साधारण सहा महिन्यांनतर पोलिसांनी ही कारवाई केली होती. या तिघांनी विविध मार्गांनी त्रास देऊन भय्यू महाराज यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा तसेच पैशांसाठी त्यांना ब्लॅकमेल केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. इंदूर येथील सत्र न्यायालयात हा खटला चालला. इंदूर सत्र न्यायालयात १९ जानेवारी रोजी या प्रकरणी साडेपाच तास सुनावणी चालली होती. त्यादिवशी सुनावणी पूर्ण करतानाच न्यायमूर्ती धर्मेंद्र सोनी यांनी २८ जानेवारी रोजी निकाल सुनावला जाईल, असे नमूद केले होते. त्यानुसार आज खटल्याचा निकाल सुनावण्यात आला आहे.
या संपूर्ण खटल्यात एकूण ३२ साक्षीदारांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या. यात भय्यू महाराज यांची दुसरी पत्नी आयुषी, मुलगी कुहू, डॉ. पवन राठी, सेवेकरी प्रवीण घाडगे यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या. आयुषी यांची उलटतपासणी घेण्यात आली होती. सुनावणीदरम्यान एकदा त्या रडल्याही होत्या. सेवेकरी प्रवीण याने कोर्टात महत्त्वाची माहिती दिली. घटनेच्या एक महिना आधी भय्यू महाराज यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला होता. तेव्हा त्यांच्या हातातील रिवॉव्हर आम्ही काढून घेतली व लपवून ठेवली. मात्र भय्यू महाराज यांना बाहेर जायचे असल्याने रिव्हॉल्व्हर त्यांना परत देण्यास आयुषी यांनी आपल्याला सांगितले होते, असे प्रवीण याने कोर्टात सांगितले.