AurangabadNewsUpdate : औरंगाबादच्या पुतळा प्रकरणात खा. संजय राऊत यांचा एमआयएमला थेट इशारा…

औरंगाबाद : औरंगाबाद शहरात सध्या शिवसेना आणि एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्यात चांगलीच जुंपली असून या वादात उडी घेताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पुतळ्याला विरोध करणाऱ्या एमआयएमला आजही आमच्या हातात तलवार आहे हे लक्षात ठेवा असा थेट इशारा दिला आहे.
औरंगाबाद शहरातील कॅनॉट परिसरात महाराणा प्रताप यांचा पुतळा उभारण्यावरून हा वाद सुरु झाला आहे. तब्बल एक कोटी खर्च करुन हा पुतळा उभारण्याचा प्रस्ताव आहे. एकीकडे शिवसेना, भाजपाने या पुतळ्यासाठी आग्रही मागणी केली असताना दुसरीकडे एमआयएमने मात्र विरोध दर्शवला आहे. खासदार इम्तियाज जलील यांनी पुतळ्याला विरोध केला आहे.
या वादावर आपली तीव्र प्रतिक्रिया देताना संजय राऊत यांनी म्हटले आहे कि , “महाराणा प्रताप यांना एमआयएमचा विरोध कशासाठी? महाराणा प्रताप, छत्रपती शिवाजी महाराज या देशाच्या शौर्याचं, राष्ट्रभक्तीचं, राष्ट्रवादाचं प्रतिक आहे. मोगलांविरुद्ध, आक्रमकर्त्यांविरोधात त्यांची तलवार चालली, त्यांनी हिंदूंचे रक्षण केलं, हिंदू महिलांना संरक्षण दिलं, हिंदू मंदिरांचं रक्षण केलं म्हणून जर कोणी महाराणा प्रताप, छत्रपती शिवाजी महाराज यांना विरोध करत असेल तर त्यांची तलवार आजही आमच्या हातात आहे हे लक्षात ठेवा.”
आमदार अंबादास दानवे यांनी पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सिडको कॅनॉट परिसरात महाराणा प्रताप यांचा पुतळा उभारण्याचा कामाला सुरुवात करण्याची मागणी केली होती. त्यावर खासदार इम्तियाज जलील यांनी मात्र महाराणा प्रताप यांचा पुतळा उभारण्याला विरोध करून याच पैशांमधून ग्रामीण भागातील तरुण आणि तरुणींसाठी सैनिकी शाळा सुरु केली जावी अशी मागणी केली. खा. जलील यांनी पालकमंत्री सुभाष देसाई आणि जिल्हाधिकाऱ्यांना तसे पत्रही दिले आहे. महाराणा प्रताप यांचा पुतळा उभारून काही साध्य होणार नाही, सैनिका शाळा हाच यांच्याप्रती खरा आदर व सन्मान असल्याचे त्यांनी पत्रात म्हटले आहे.