PoliticalNewsUpdate : अखेर पटोले यांनी उल्लेख केलेला “तो ” गावगुंड मोदी ” असा आला पुढे !!

भंडारा : “मीच तो गावगुंड आहे…” असे म्हणत उमेश घरडे नावाच्या व्यक्तीने आपल्या वकिलांच्या समवेत पत्रकारांच्या समोर येऊन आपणच तो मोदी नावाने ओळखला जाणारा गावगुंड आहोत असे म्हटले असल्याने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना अखेर दिलासा मिळाला आहे. या वादावर बोलताना मी दोषी असेल तर पोलिसांनी माझ्यावर कारवाई करावी असे आव्हानही दिले होते परंतु आता हा कथित ” गावगुंड मोदी ” पुढे आला आहे.
“माझ्या विरोधात काही गुन्हे दाखल असल्याने मी घाबरलो होतो त्यामुळे गायब होतो…” असा दावा उमेश घरडे उर्फ कथित गावगुंड मोदी याने केला आहे. भंडारा पोलिसांकडून उमेश घरडेची चौकशी चालू आहे. उमेश घरडे हा लाखणी तालुक्यातील गोंदी गावचा रहिवासी आहे.
याबाबतची माहिती अधिक माहिती अशी कि , उमेश घरडे हा पत्नी आणि मुलांसोबत न राहता एकटाच राहत आहे. मात्र घरडेविरोधात पोलिसांकडे कोणत्याही प्रकारची गुन्ह्याची नोंद नाही असे गावकऱ्यांनी म्हटले आहे. दरम्यान नाना पटोले यांनी ” मी मोदीला मारू शकतो आणि शिव्याही देऊ शकतो असे वक्तव्य केल्यानंतर संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली होती. त्यांच्या या वक्तव्याचा निषेध करीत भाजपाने नाना पटोले यांच्या विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करून पोलिसात तक्रारीही दाखल केल्या होत्या.
दरम्यान या प्रकरणावर नाना पटोले यांनी स्पष्टीकरण देत आपण स्थानिक गावगुंडाच्या संदर्भात बोलत असल्याचे म्हटले होते परंतु त्यांच्या विरोधात मोठी टीका केली जात होती. त्यात आता उमेश घरडे हा मोदी नावाचा कथित गावगुंड वकिलांच्या समवेत माध्यमांच्या समोर आला आहे. तो म्हणाला कि, “मी दारू विकतो, पितो आणि त्यातूनच नाना पटोले यांच्या विरोधात अपशब्द बोललो आणि त्यांच्या विरोधात प्रचार केला होता असे म्हटले. अनेक लोकं माझ्या मागे लागले त्यामुळे मी घाबरून समोर येत नव्हतो,” असे म्हटले.