PanjabaElectionUpdate : गुरु रविदासांच्या जयंतीच्या निमित्ताने पंजाब निवडणुकीच्या तारखेत बदल

अमृतसर : गुरु रविदासांच्या जयंतीमुळे पंजाबमधील सर्व ११७ जागांसाठी १४ फेब्रुवारीला एकाच टप्प्यात मतदान होणार होते, ते मतदान आता २० तारखेला होणार असल्याची घोषणा निवडणूक आयोगाने केली आहे. पंजाब सरकारच्या विनंतीवरून निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला आहे. राज्य सरकार आणि विविध राजकीय पक्षांनी निवडणुकीची तारीख पुढे ढकलण्याची विनंती केली होती, ती विनंती स्वीकारत निवडणूक आयोगाने नवीन तारीख दिली आहे.
पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून गुरु रविदास जयंतीनिमित्त १४ फेब्रुवारीच्या विधानसभा निवडणुका किमान सहा दिवस पुढे ढकलण्यात याव्यात, अशी मागणी केली होती. मतदानाच्या दोन दिवसांनी १६ फेब्रुवारीला रविदास जयंती आहे. पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी पत्रात लिहिले होते की, की पंजाबच्या ३२ टक्के लोकसंख्येचा समावेश असलेल्या अनुसूचित जाती समुदायाच्या प्रतिनिधींनी त्यांना सांगितले होते की रविदास जयंतीनिमित्त १० ते १६ फेब्रुवारी रोजी समुदायातील लोक मोठ्या संख्येने वाराणसीला भेट देतात. अशा परिस्थितीत संविधानिक अधिकार असलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी अनेकांना मतदान करता येणार नाही.
Punjab Assembly election will be held on 20th February: ECI pic.twitter.com/rPJTAt0OEn
— ANI (@ANI) January 17, 2022
दरम्यान पंजाब सरकारबरोबरच भाजपा आणि त्यांचा मित्रपक्ष असलेल्या कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या पंजाब लोक काँग्रेसनेही निवडणूक आयोगाला पत्र लिहून पंजाबमध्ये १४ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या मतदानाला पुढे ढकलण्याची मागणी केली होती. पंजाब भाजपाचे सरचिटणीस सुभाष शर्मा यांनी रविवारी मुख्य निवडणूक आयुक्तांना लिहिलेल्या पत्रात म्हटले होते की, “राज्यात गुरु रविदासजींचे अनुयायी मोठ्या संख्येने आहेत, ज्यात अनुसूचित जाती समुदायाचा समावेश आहे, जे लोकसंख्येच्या सुमारे ३२ टक्के आहे. या पवित्र प्रसंगी लाखो लोक उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे गुरपर्व साजरे करण्यासाठी जातील. त्यामुळे त्यांना मतदान प्रक्रियेत सहभागी होणे शक्य होणार नाही.” अशीच विनंती आपच्या पंजाब युनिटचे प्रमुख भगवंत मान यांनीही निवडणूक आयोगाकडे केली होती.