CoronaIndiaAlert : ओमिक्रॉनबाबत केंद्राच्या आरोग्य विभागाने दिली हि अधिकृत माहिती

https://www.youtube.com/watch?v=7iZ2hqOjCJQ
नवी दिल्ली: कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक तेथे रात्रीची संचारबंदी आणि आवश्यक त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे निर्देश गुरुवारी केंद्र सरकारने सर्व राज्यांना दिले आहेत. त्यानुसार महाराष्ट्र , मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश या राज्यांत मोठी पावले उचलण्यात आली असतानाच केंद्रीय आरोग्य मंत्रलायाने आज ओमायक्रॉन जागतिक स्थिती आणि भारताला असलेला संभाव्य धोका याबाबत अत्यंत महत्त्वाची माहिती दिली व नव्याने अलर्ट केले आहे.
केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी या संदर्भात घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले कि , जगभरातील १०८ देशांमध्ये ओमिक्रॉनचा फैलाव झाला आहे. आतापर्यंत ओमिक्रॉनचे १ लाख ५१ हजार रुग्ण आढळले आहेत तर २६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ब्रिटन, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, डेन्मार्क, नॉर्वे, कॅनडा, जर्मनी, दक्षिण आफ्रिका या देशांत ओमिक्रॉनचे सर्वात जास्त रुग्ण आढळले आहेत, असे राजेश भूषण यांनी नमूद केले. भारतात आतापर्यंत ओमिक्रॉनचे ३५८ रुग्ण आढळले आहेत. त्यातील ११४ रुग्ण बरे झाले आहेत. एकूण १७ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांत ओमिक्रॉनने शिरकाव केला आहे, असेही भूषण यांनी सांगितले.
पुन्हा जगभरात कोविडचे रुग्णही वाढत आहेत. जागतिक आकडेवारीनुसार गुरुवारी (२३ डिसेंबर) एकाच दिवशी ९.५४ लाख नवे रुग्ण आढळले आहेत. ही जगासाठी कोरोनाची चौथी लाट म्हणावी लागेल. त्यात अमेरिका, यूरोप, आफ्रिका खंडात रुग्णवाढ अधिक आहे तर तुलनेने आशियात रुग्णवाढीचा वेग कमी आहे. भारतात गेल्या २४ आठवड्यांपासून दररोज सरासरी ७ हजार नवे कोरोना बाधित आढळत आहेत. असे असले तरी जागतिक स्थिती लक्षात घेत आपल्याला अधिक सतर्क राहावे लागणार असल्याचे भूषण यांनी म्हटले आहे.
दरम्यान डेल्टा व्हेरिएंटच्या तुलनेत ओमिक्रॉनचा फैलाव अधिक वेगाने होत असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले असून त्यासाठी कोविड नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याची आवश्यकता आहे. म्हणूनच आम्ही वारंवार आवाहन करत आहोत, असे भूषण यांनी सांगितले. जगातील काही देश कोरोनाच्या चौथ्या लाटेचा सामना करत आहेत तर भारताला आतापर्यंत दोन लाटांचा सामना करावा लागला आहे. सद्यस्थितीत केरळ, महाराष्ट्र, तामिळनाडू, कर्नाटक, पश्चिम बंगाल आणि मिझोराम या राज्यांत सर्वात जास्त रुग्ण आढळत आहेत. त्यात केरळ आणि मिझोरामबाबत अधिक चिंता वाटत आहे. तिथे पॉझिटिव्हिटी रेट ६ टक्क्यांपेक्षा जास्त असून मिझोराममधील दोन जिल्ह्यांत तर हा दर १० टक्क्यांहून अधिक असल्याने त्याबाबत आवश्यक सूचना दिल्या गेल्या आहेत, असे भूषण यांनी नमूद केले. देशातील जवळपास २० जिल्ह्यांत रुग्णवाढ अधिक असून त्यावर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे.