OmicronMaharashtraUpdate : राज्यात आज ओमायक्रॉनची लागण झालेल्या ७ नव्या रुग्णांची नोंद

मुंबई : राज्यात आज ओमायक्रॉन लागण झालेल्या एकूण ७ रुग्णांची नोंद झाली असून या ७ रुग्णांपैकी ४ रुग्ण पिंपरी चिंचवडमध्ये तर ३ रुग्ण मुंबईत आढळले आहेत. यामुळे आता राज्यातील एकूण ओमिक्रॉन रुग्णांची संख्या वाढून ती १७ वर पोहोचली आहे. राष्ट्रीय विज्ञान सस्थेने याबाबत माहिती दिली आहे. या माहितीनुसार मुंबईत आढळून आलेले ३ रुग्ण ४८, २५ आणि ३७ वर्षांचे पुरुष आहेत. त्यातील ४८ वर्षीय व्यक्ती टांझानियातून, २५ वर्षीय तरुण हा इंग्लंडमधून तर, ३७ वर्षीय व्यक्ती ही दक्षिण आफ्रिकेतील नैरोबी या देशांमधून प्रवास करून आलेली आहे. दरम्यान पिंपरी चिंचवडमध्ये आढललेले ४ ही रुग्ण हे नायजेरियावरुन आलेल्या ओमायक्रॉन बाधित आढळलेल्या महिलेचे येथील नातेवाईक आहेत.
विशेष म्हणजे आज आढळलेल्या ७ रुग्णांपैकी एकूण ४ जणांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. एका रुग्णाने लसीचा एकच डोस घेतला आहे. तर एका रुग्णाचे लसीकरण झालेले नाही. एका रुग्णाचे वय साडे तीन वर्षे असल्याने लसीकरण झालेले नाही अशी माहिती मिळत आहे. या ७ रुग्णांपैकी ४ रुग्ण लक्षणेविरहित आहेत. तर ३ रुग्णांना सौम्य स्वरुपाची लक्षणे आहेत. दरम्यान एकीकडे आज मुंबईत ३ नवे ओमायक्रॉन रुग्ण आढळल्याने चिंता वाढलेली असताना मुंबईकरांसाठी एक दिलासा देणारी बातमीही आली आहे. ती म्हणजे मुंबईतील पहिला ओमायक्रॉन रुग्ण पूर्णपणे बरा झाला आहे. त्याला डिस्चार्ज देण्यात आला आहे.
दरम्यान १ डिसेंबर पासून ते ९ डिसेंबर या ९ दिवसांच्या काळात परदेशातून आलेल्या प्रवाशांची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे. त्यानुसार या ९ दिवसांमध्ये हाय रिस्क असलेल्या देशांमधून ८ हजार ८४६ प्रवासी आलेले आहेत. तसेच इतर देशांमधून ४४ हजार ०५८ इतके प्रवासी आलेले आहेत. म्हणजेच ९ दिवसांमध्ये राज्यात एकूण ५२ हजार ९०४ इतके प्रवासी आलेले आहेत. त्याच प्रमाणे ज्यांची आरटीपीसीआर केलेली आहे असे हाय रिस्क देशांमधून आलेल्या प्रवाशांची संख्या ८ हजार ८४६ इतकी असून इतर देशांमधून आलेल्या प्रवाशांची संख्या १ हजार ०९९ इतकी आहे.
आरोग्य तपासणीत ज्या प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी पॉझिटिव्ह आली आणि त्यांचे नमुने तपासणीसाठी जीनोमीक सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आलेले आहेत अशा हाय रिस्क देशांमधून आलेल्या प्रवाशांची एकूण संख्या १३ इतकी असून इतर देशांमधून ३ प्रवासी आलेले आहेत. म्हणजे पॉझिटिव्ह प्रवाशांची एकूण संख्या १६ इतकी आहे. तसेच आतापर्यंत विमानतळांवरून एकूण ८० जणांचे नमूने जीनोमीक सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले असून ५५ जणांचा रिपोर्ट अजून यायचा आहे.