OmicronIndiaUpdate : काय आहे ‘ओमायक्रॉन’ ची आजची स्थिती ? काळजी करू नका, काळजी घ्या , केंद्रीय आरोग्य विभागाचे आवाहन

नवी दिल्ली : केंद्र सरकारने ‘ओमायक्रॉन’ विषाणूचे दोन रुग्ण कर्नाटकात आढळले असले तरी या दोन्हीही रुग्णांना सौम्य लक्षणे आहेत. त्यामुळे देशातील नागरिकांनी घाबरून न जात काळजी घेण्याचे आवाहन केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाने केले आहे. या दोन रुग्णांपैकी दक्षिण आफ्रिकेतून दुबईमार्गे आलेला रुग्ण त्यांच्या देशात सुखरूप परतला आहे तर दुसरा रुग्ण खासगी डॉक्टर आहे. देशातील ८४.३ टक्के प्रौढ नागरिकांनी करोना लशीची पहिली मात्रा घेतल्याचे तर ४९ टक्के प्रौढ नागरिकांनी दुसरी मात्रा घेतल्याची माहिती केंद्र सरकारने दिली.
याबाबत अधिक माहिती देताना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अगरवाल यांनी म्हटले आहे कि , ‘ओमायक्रॉन’चे कर्नाटकातील दोन्ही रुग्ण पुरुष आहेत. त्यांचे वय ६६ आणि ४६ वर्षे आहे. दोन्ही रुग्णांना सौम्य लक्षणे आहेत, तीव्र लक्षणे नोंदवण्यात आलेली नाहीत. तसेच या दोन्ही रुग्णांच्या संपर्कात आलेल्या सर्व लोकांचा शोध घेण्यात यश आले असून त्यांच्या चाचण्या करण्यात येत आहेत. ‘ओमायक्रॉन’चे रुग्ण आढळले असले तरी लोकांनी भयभीत न होता करोना प्रतिबंधांचे नियम पाळावेत आणि लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन आरोग्य मंत्रालयाच्या वतीने करण्यात आले.
घाबरून जाण्याची गरज नाही, पंरतु त्याविषयी जागरूक राहणे अत्यंत आवश्यक आहे. करोना नियमांचे पालन करावे आणि गर्दीचे कार्यक्रम टाळावेत. तसेच लसीकरणाची व्याप्ती वाढवण्याची गरज असून, संपूर्ण लसीकरण करण्यात दिरंगाई करू नये, असेही केंद्रीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
२५ जण कोरोनाबाधित
दरम्यान आफ्रिकेसह अन्य देशांतून प्रवास करून आलेल्या प्रवाशांपैकी २५ जण कोरोनाबाधित असल्याचे आढळले. यांच्या सहवासातील तीन जणांना कोरोनाची बाधा झाली असून, एकूण २८ जणांचे नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. गेल्या २४ तासांत मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर ८६१ प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी घेण्यात आली. त्यापैकी तीन जण बाधित असल्याचे आढळले.
संपर्कातील पाचजणही कोरोनाबाधित
कर्नाटकात आढळलेल्या ओमायक्रॉनच्या दोन रुग्णांपैकी ६६ वर्षांचा रुग्ण हा दक्षिण आफ्रिकेचा नागरिक आहे. भारतात आल्यानंतर गेल्याच आठवडय़ात हा रुग्ण दक्षिण आफ्रिकेत परतला आहे तर ओमायक्रॉनचा दुसरा रुग्ण हा बंगळूरु येथील खासगी रुग्णालयातील ४६ वर्षीय डॉक्टर असून त्याने मात्र कोणताही परदेशी प्रवास केलेला नाही. त्याच्या संपर्कातील पाचजणही करोनाबाधित आढळले आहेत. त्यांचे नमुने जनुकीय क्रमनिर्धारणासाठी पाठविण्यात आले आहेत. त्यांच्या अहवालानंतर त्यांना ओमायक्रॉन आहे की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
आरोग्य कर्मचाऱ्यांना बुस्टर डोस देण्याची तयारी
दरम्यान, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी गुरुवारी केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांच्याशी ‘ओमायक्रॉन’बाबत चर्चा केली. केंद्रीय आरोग्यमंत्र्यांशी आरोग्य कर्मचाऱ्यांना वर्धक मात्रा (बुस्टर डोस) देण्याबाबतही चर्चा केली, असे बोम्मई यांनी सांगितले. गेल्या आठवडय़ात भारतासह दक्षिण आशियात उर्वरित जगाच्या तुलनेत ३.१ कोरोना रुग्ण आढळल्याची माहिती यावेळी अधिकाऱ्यांनी दिली.
अभ्यास चालू आहे
जगभरात सध्या ओमायक्रॉन या करोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे चिंता वाढली आहे. त्याचा अजूनही पूर्ण अभ्यास होणं बाकी असलं, तरी काही मूलभूत निरीक्षणं आणि अभ्यासातून वैज्ञानिकांनी काही निष्कर्ष काढले आहेत. नेदरलँडमध्ये झालेल्या अशाच एका अभ्यासातून हा ओमायक्रॉन व्हेरिएंट दक्षिण अफ्रिकेत सापडण्याच्याही आधी नेदरलँडमध्ये पोहोचला असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आलं आहे.
जगभरातील ३० देशांमध्ये पोहोचला ओमायक्रॉन
दरम्यान, नेदरलँडमध्ये १९ नोव्हेंबर रोजीच या व्हेरिएंटचे नमुने गोळा करण्यात आले असल्याचं समोर आल्यामुळे ओमायक्रॉन नेमका किती देशांमध्ये बेमालूमपणे पसरला असेल, याचा निश्चित अंदाज आत्ता व्यक्त करणं वैज्ञानिकांसाठी कठीण झालं आहे. पहिल्यांदा सापडल्यानंतर गेल्या १० ते १२ दिवसांमध्ये ओमायक्रॉननं जवळपास ३० देशांमध्ये शिरकाव केला असून एकूण बाधित रुग्णांची संख्या ३७४ झाली आहे.
भयभीत न होता करोना प्रतिबंधांचे नियम पाळावेत : वडेट्टीवार
‘ओमायक्रॉन’चे रुग्ण आढळले असले तरी लोकांनी भयभीत न होता करोना प्रतिबंधांचे नियम पाळावेत आणि लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन आरोग्य मंत्रालयाच्या वतीने करण्यात आले आहे. करोना नियमांचे पालन करावे आणि गर्दीचे कार्यक्रम टाळावेत. तसेच लसीकरणाची व्याप्ती वाढवण्याची गरज असून, संपूर्ण लसीकरण करण्यात दिरंगाई करू नये, असेही केंद्रीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. यादरम्यान महाराष्ट्रात सुरक्षेच्या दृष्टीने नवी नियमावली जाहीर होण्याची शक्यता आहे. म्युकरमायकोसिसची जितकी तीव्रता होती किंवा जेवढं नुकसान होत होतं तसं यात काही नाही. लोकांनी घाबरुन जाण्याची गरज नाही, असे आवाहन राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केले.
पुढे बोलताना ते म्हणाले की, “या राज्यातील नागरिकांची सुरक्षा करणं सरकारचं काम आहे. मुख्यमंत्री याबाबत संवेदनशील आहेत. मुख्यमंत्री तज्ज्ञांशी चर्चा करत असून दोन दिवसांमध्ये नियमावलीसंबंधी निर्णय होईल”.
राजेश टोपे यांनी दिलेली माहिती
परदेशांतून मुंबईत येणाऱ्या प्रवाशांना १४ दिवसांचे विलगीकरण बंधनकारक करण्याच्या महाराष्ट्राच्या आदेशाबाबत केंद्राने आक्षेप घेतल्यानंतर सरसकट सर्व देशांऐवजी जोखमीच्या देशांमधून येणाऱ्या प्रवाशांचे विलगीकरण करण्याचा सुधारित आदेश गुरुवारी राज्य सरकारने जारी केला. दक्षिण आफ्रिका, झिंब्बाब्वे आणि बोट्सवाना या सध्याच्या जोखमीच्या देशांमधून (हाय रिस्क कंट्रीज) येणाऱ्या प्रवाशांची विमानतळावर आरटीपीसीआर चाचणी करून त्यांचे १४ दिवसांचे सक्तीने विलगीकरण करण्यात येणार आहे, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.