MumbaiNewsUpdate : ‘वन शहीद’ स्वाती ढुमणे यांच्या कुटुंबियांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून सांत्वन

मुंबई : वनरक्षक स्वाती ढुमणे यांच्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प क्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात झालेल्या मृत्यूबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोक व्यक्त केला असून त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले आहे. दरम्यान स्वाती ढुमणे यांच्याप्रति संवेदना व्यक्त करतानाच, त्यांच्या कुटुंबीयांना १५ लाख रुपयांची मदत देण्याचे, तसेच त्यांच्या पतीला वन विभागाच्या सेवेत घेण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे.
वनरक्षक स्वाती ढुमणे कर्तव्यावर असताना, वाघाने त्यांच्यावर हल्ला करून ओढून नेल्याने त्यांचा मृत्यू झाला होता. या दुर्दैवी प्रकाराबाबत मुख्यमंत्री ठाकरे यांनी मृत ढुमणे आणि त्यांच्या कुटुंबीयाप्रति संवेदना प्रकट केली आहे. वन विभागाच्या तरतुदीनुसार संबंधित निधीतून ढुमणे यांच्या कुटुंबीयांना १५ लाख रुपयांची मदत देण्याचे जाहीर केले आहे. तसेच ढुमणे यांच्या पतीला वन विभागाच्या सेवेत सामवून घेण्याचेही निर्देशित केले आहे.
शनिवारची घडली होती घटना
शनिवारी सकाळी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात व्याघ्र प्रगणनेची प्रक्रिया सुरू असताना वाघाने अचानक हल्ल्या करून महिला वनरक्षक स्वाती ढुमणे (४२) यांना ठार केले. स्वाती ढुमणे या जिवती तालुक्यातील वणी येथील रहिवासी होत्या. देशपातळीवरील व्याघ्र प्रगणनेच्या कार्यक्रमाअंतर्गत ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातही शनिवारपासून गणनेला सुरुवात झाली. त्यानुसार स्वाती ढुमणे आणि त्यांच्या तीन सहकाऱ्यांना प्राण्यांच्या खुणा नोंदवण्याचे काम देण्यात आले होते. कोलारा गेट ते कक्ष क्रमांक ९७ पाणवठ्यापर्यंत या भागात त्या काम करत होत्या. त्यावेळी त्यांना मार्गात एक वाघ दिसला. हा वाघ निघून जावा यासाठी या पथकाने सुमारे अर्धा तास वाट पाहिली. त्यानंतर मागे न फिरता वाघाच्या बाजूने वाट काढण्याचा त्यांनी प्रयत्न केला. पण रस्ता नसल्यामुळे त्यांना तिथून बाहेर पडता आले नाही. यातच वाघाने स्वाती यांच्यावर हल्ला केला आणि स्वाती यांना उचलून काही अंतरावर नेले. या झटापटीत स्वाती यांचा मृत्यू झाला.
वाघाच्या हल्ल्याची माहिती मिळताच याबाबतची माहिती मिळताच ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक डॉ. जितेंद्र रामगावकर व उपसंचालक नंदकिशोर काळे घटनास्थळी पोहोचले. शवविच्छेदनानंतर स्वाती यांच्यावर चिमूर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. कर्तव्यावर असताना निधन झाल्यामुळे स्वाती ढुमणे यांना ‘वन शहीद’ घोषित करण्यात आले आहे. या वर्षी चंद्रपूर जिल्ह्यात वन्यजीव हल्ल्यात ठार झालेल्यांची संख्या आता ३५ वर पोहोचली आहे.