MaharashtraNewsUpdate : ‘बैल कितीही का आठमुठा असेना, शेतकरी आपलं शेत नांगरून घेतोच… खा. संजय राऊत यांचे ट्विट !!

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल शुक्रवारी शेतकऱ्यांचा विरोध असलेले तीन केंद्रीय कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केल्यानंतर त्यांच्या या निर्णयाचे स्वागत होत असतानाच अनेकांनी त्यांच्यावर टीका केली आहे . सातत्याने या ना त्या निमित्ताने चर्चेत असलेले शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे.हा निर्णय त्यांनी यापूर्वीच घेतला असता तर अनेक शेतकऱ्यांचे प्राण वाचले असते असे त्यांनी म्हटले आहे.
आपल्या ट्विटमध्ये खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारला टोला लगावला आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे कि , ‘बैल कितीही का आठमुठा असेना, शेतकरी आपलं शेत नांगरून घेतोच. जय जवान, जय किसान’ पंतप्रधानांनी काल केंद्रीय कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केल्यानंतरही खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत पंतप्रधानांना शेतकरी कुटुंबांची माफी मागण्याचे आवाहन केले होते. ज्या ७०० शेतकऱ्यांनी आपला जीव गमावला त्यांच्या कुटुंबीयांची पंतप्रधान मोदी यांनी माफी मागावी, असे आवाहन राऊत यांनी केले होते. तसेच ज्यांनी जीव गमावला त्यांच्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी आर्थिक मदत जाहीर करावी, अशीही मागणीह त्यांनी केली होती. याबरोबरच लाल किल्ल्यावरील हिंसाचाराच्या गुन्ह्यांसह शेतकऱ्यांवरील सर्व खटले मागे घ्यावेत, अशीही मागणी त्यांनी केली होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सात वर्षात पहिल्यांदाच देशातील जनतेचा आवाज ऐकला आहे, अशी प्रतिक्रियाही खासदार राऊत यांनी पंतप्रधानांच्या घोषणेनंतर व्यक्त केली होती. मोदी यांनी पहिल्यांदाच मन की बात ऐकली. दिल्लीत अनेक शेतकऱ्यांचा मृत्यूही झाला. हे पाहता पंतप्रधानांनी जर एक वर्षापूर्वीच शेतकऱ्यांचं ऐकलं असतं तर अनेकांचा जीव वाचला असता, असा टोलाही खासदार राऊत यांनी पंतप्रधान मोदींना लगावला आहे.