MumbaiNCBNewsUpdate : आर्यनची अखेर २५ दिवसानंतर होणार जामिनावर सुटका

मुंबई : एनसीबीने क्रूझवर केलेल्या कारवाईत गेल्या २५ दिवसांपासून अटकेत असलेल्या आर्यन खानला अखेर जामीन मिळाला आहे. त्याच्यासह अटकेत असलेल्या मुनमुन धमेचा आणि अरबाज मर्चंट यांनाही जामीन आज मुंबई उच्च न्यायालयाने मंजूर केला आहे. हे तिघेही उद्या किंवा परवा आर्थर रोड तुरुंगातून बाहेर येणार आहेत. त्यामुळे आर्यन खानची दिवाळी आता आपल्या घरी ‘मन्नतवर’ होणार असली तरी आज त्यांच्या जामीनाचे आदेश न मिळाल्याने आजची रात्र त्यांना आर्थर रोड तुरुंगातच काढावी लागणार आहे.
गेल्या तीन दिवसांपासून उच्च न्यायालयात त्यांच्या जमिनीबाबत युक्तिवाद सुरू होता. मात्र, ती सुनावणी अपूर्ण राहिल्याने आर्यन खान आणि इतर दोघांच्या जामीन अर्जांवर उर्वरित सुनावणी काल पार पडली. आर्यनतर्फे युक्तिवाद मंगळवारी पूर्ण झाला होता. तर काल अरबाझ मर्चंट आणि मुनमून धमेचातर्फे युक्तिवाद पूर्ण झाला. मात्र एनसीबीचा युतीवाद राहिल्याने न्यायमूर्ती नितीन सांब्रे यांनी आज सुनावणी ठेवली होती. एनसीबीच्यावतीने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांच्यासह श्रीराम शिरसाट आणि विशेष सरकारी वकील अद्वैत सेठना यांनी जोरदार युक्तिवाद केला. मात्र, आर्यन खानसह अरबाझ आणि मुनमुन यांना उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. उद्या उच्च न्यायालयाच्या आदेशाची प्रत मिळाल्यानंतर तुरुंगातून बाहेर येण्याची प्रक्रिया सुरु होईल.
आर्यन खानची बाजू मांडण्यासाठी भारताचे माजी अॅटर्नी जनरल आणि ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी यांच्यासह ज्येष्ठ वकील सतीश मानेशिंदे न्यायालयात हजर होते. तिन्ही आरोपींच्या वकिलांनी जामिनासाठी न्यायालयासमोर युक्तिवाद केल्यानंतर आज एनसीबीच्यावतीने अतिरिक्त सॉलिसीटर जनरल अनिल सिंग यांनी बाजू मांडली. त्यावर रोहतगी यांनी पुन्हा युक्तिवाद केला. यानंतर न्यायालयाने निर्णय सुनावला.
दरम्यान या जमिनीच्या हायकोर्टाच्या निर्णयाची प्रत उद्या मिळणार आहे. त्यानंतर उद्या किंवा परवा आर्यन खानसह तिघेही तुरुंगातून बाहेर येतील, असे आर्यनचे वकील मुकूल रोहतगी यांनी सांगितले. साक्षीदार फोडू नये, तपासात अडथळा आणू नये, परवानगीशिवाय शहराबाहेर जाऊ नये, प्रत्येक शुक्रवारी कोर्टात हजर राहावे आदी अटी शर्तीवर त्यांना जामीन देण्यात आला आहे, असे वकिलांनी सांगिले. मात्र, जामिनाची रक्कम अजून कळली नसल्याचं त्यांनी स्पष्ट केले.
आर्यनच्या वकिलांचा युक्तिवाद
वरिष्ठ वकील मुकुल रोहतगी म्हणाले, “अरबाजकडे काही आहे की नाही याविषयी आर्यनला कोणतीही माहिती नव्हती. वादासाठी हे माहिती होते असे मानले तरी सामूहिकपणे व्यावसायिक स्तरावरील ड्रग्जची मात्रा सापडले इतकेच म्हणू शकता. त्याला एनसीबी षडयंत्र म्हणत आहे. आर्यनविरोधातील कलम २७ अ हटवण्यात आलेले नाही. आर्यनसोबतच्या ५-८ लोकांकडील ड्रग्जची बेरीज करून त्याला व्यावसायिक मात्रा म्हटले जात आहे.”