बहुचर्चित फरार आरोपी किरण गोसावीला अशी झाली अटक

अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान सध्या मुंबईत क्रूझवरील ड्रग्ज प्रकरणी अटकेत आहे. सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी आर्यन खानवरील कारवाईवरुन अनेक प्रश्न उपस्थित केले असून एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. नवाब मलिक यांनी आरोपांना सुरुवात केली तेव्हा किरण गोसावी नावाचा उल्लेख केला होता. याशिवाय आर्यन खानसोबत सेल्फी काढल्यामुळेही तो चर्चेत होता. क्रूझवरील संपूर्ण कारवाईदरम्यान समीर वानखेडेंसोबत असणारा साक्षीदार किरण गोसावीला पुणे पोलिसांनी फसवणुकीच्या एका गुन्ह्याखाली अटक केली आहे. दरम्यान पुणे पोलिसांनी ताब्यात घेण्याआधी किरण गोसावी याने एक व्हिडीओ प्रसिद्ध केला असून यामध्ये त्याने आपल्याविरोधात आरोप करणाऱ्या अंगरक्षक प्रभाकर साईलची चौकशी करण्याची मागणी केली आहे. यात त्याने सत्ताधारी किंवा विरोधातील नेत्याने आपल्या पाठीशी उभे राहावे असेही म्हटले आहे.
“मी प्रभाकर साईलविषयी काही बोलू इच्छितो. सॅम डिसूझासोबत कोणाचे संभाषण झाले?; किती पैसे कोणी घेतले? प्रभाकर साईलला गेल्या पाच दिवसांत काय ऑफर आल्या आहेत? हे त्याच्या मोबाइलमधून स्पष्टपणे समजेल. प्रभाकर साईल आणि त्याच्या दोन्ही भावांचे सीडीआर रिपोर्ट आणि मोबाइल संभाषण काढावे,” अशी मागणी किरण गोसावीने या व्हिडियो द्वारे केली आहे.
प्रभाकर साईलच्या आरोपांनंतर किरण गोसावीला अटक
Kiran Gosavi has been arrested in a 2018 cheating case. A charge-sheet was filed in the case in 2019. If we get more complaints against him, we will register fresh offence against him: Amitabh Gupta, Commissioner of Police, Pune City pic.twitter.com/qkh9tsCFj7
— ANI (@ANI) October 28, 2021
प्रभाकर साईलच्या आरोपांनंतर चर्चेत आलेल्या किरण गोसावीला अखेर पुणे पोलिसांनी अटक केली आहे. किरण गोसावीने सरेंडर केलेले नसून आम्ही आमच्या इंटलिजेंसच्या आधारे त्याला अटक केली आहे असा दावा पुणे पोलिसांनी केला आहे. प्रभाकर साईल आर्यन खानला ज्या प्रकरणी ताब्यात घेण्यात आले आहे, त्या मुंबई क्रूझ ड्रग्स प्रकरणातील पंच आहे. तर दुसरा पंच असलेल्या किरण गोसावीचा बॉडिगार्डही आहे. प्रभाकर साईलने माध्यमांसमोर येत गौप्यस्फोट केल्यापासूनच किरण गोसावी फरार होता. तो लखनौमध्ये असल्याची माहिती मिळाली होती. याप्रकरणी पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सकाळी माध्यमांशी संवाद साधला.
पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणातील एनसीबीचे वादग्रस्त पंच किरण गोसावीला पुण्यात अटक करण्यात आली आहे. त्याला पुण्यातील एका लॉजमध्ये पहाटे 3.30 वाजता ताब्यात घेण्यात आले. तसेच पुण्यात दाखल करण्यात आलेल्या फसवणूकीच्या गुन्ह्यातंर्गत किरण गोसावीला अटक करण्यात आली आहे. किरण गोसावीने नोकरीचे अमिष दाखवून फसवणूक केली होती. मागील काही दिवसांपासून किरण गोसावीचा अनेक राज्यांमध्ये वावरत होता. अशातच किरण गोसावीचा ताबा जर इतर यंत्रणांनी मागितला तर प्रक्रिया केली जाईल, असेही पोलीस आयुक्तांनी सांगितले.
फसवणूकीच्या गुन्ह्यातंर्गत किरण गोसावीला अटक
२०१८ मध्ये कसबा पेठ परिसरात राहणारा चिन्मय देशमुख हा नोकरीच्या शोधत होता. त्यावेळी त्याची किरण गोसावी आणि शेरबानो कुरेशी यांच्या सोबत ऑनलाईन ओळख झाली. या दोघांनी चिन्मयला मलेशियामध्ये चांगल्या पगाराची नोकरी लावतो असे सांगितले. त्यावर त्याच्याकडे वेळोवेळी पैशांची मागणी केली. त्यानुसार चिन्मयने तीन लाख रुपये दिले. मात्र तरी देखील नोकरी बाबत काही सांगितले गेले नाही. त्यावर अखेर त्यांनी फसवणुक झाल्याची तक्रार दिली होती. या तक्रारीच्या आधारे किरण गोसावी आणि शेरबानो कुरेशी यांना पोलिसांनी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले होते. मात्र त्या दोघांनीही काही प्रतिसाद दिला नव्हता. त्यावर दोघा आरोपींच्या शोधासाठी विविध ठिकाणी पथके रवाना करण्यात आली. यानंतर किरण गोसावीची मैत्रीण शेरबानो कुरेशी हिला मुंबईतून अटक करण्यात आली आहे. तसेच, किरण गोसावीविरोधात लुकआऊट नोटीस काढण्यात आली होती.