चर्चेत राहण्यासाठी काँग्रेस नेते चुकीचे वक्तव्य करून गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न करतात : नितीन गडकरी

नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस त्यांच्यात छत्तीसचा आकडा आहे. असा गौप्यस्फोट विजय वडेट्टीवार यांनी एका कार्यक्रमात केला होता. केंद्रीय रस्ते व महामार्ग विकास मंत्री नितीन गडकरी यांनी तात्काळ खुलासा केला. ‘देवेंद्र फडणवीस यांच्या संदर्भात मी राज्य सरकारमधील मंत्री विजय वडेट्टीवार यांना कधीही, कोणतीही गोष्ट गुपचूप सांगितलेली नाही. वडेट्टीवारांनी तशी वक्तव्ये करून बेजबाबदार आणि खोडसाळ राजकारण करू नये.
एका कार्यक्रमात विजय वडेट्टीवार यांनी गौप्यस्फोट केला की, भाजपमध्ये दोन टोक आहेत. एकीकडे नितीन गडकरी आहेत तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस आहेत. त्यांच्यात छत्तीसचा आकडा आहे. फडणवीसांची मला जिरवायचीच होती आणि जिरवून टाकली. आता पुन्हा जिरवणार आहे असे गडकरी मला एकदा बोलता बोलता म्हणाले होते. या वर नितीन गडकरी यांनी प्रतिक्रिया दिली, ‘वडेट्टीवारांच्या भाषणाची क्लिप पाहून मला आश्चर्य वाटले. त्यांचे वक्तव्य पूर्णतः निराधार, खोटे आणि बेजबाबदारपणाचे आहे. फडणवीस हे माझ्यासाठी धाकट्या भावासारखे आहेत. शिवाय, ते माझ्या पक्षातील महत्त्वाचे नेते आहेत. एकमेकांच्या विरोधात काड्या करणे आणि एकमेकांची जिरवणे ही काँग्रेसची परंपरा आहे. त्यामुळे तशा प्रकारचा संभ्रम काँग्रेसचे मंत्री वडेट्टीवार आमच्याही बाबतीत निर्माण करू पाहतात, ‘फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात महाराष्ट्राची प्रगती झाली. विरोधी पक्ष नेते म्हणूनही ते उत्तम काम करीत आहेत. महाविकास आघाडीच्या चुकांवर नेमके बोट ठेवून ते लोकशाहीतील विरोधकांचे कर्तव्य निभावत आहेत. सरकार तीन पक्षांचे असले तरी काँग्रेसमध्ये नैराश्य आहे. त्यांना कुणीही मोजत नाही. त्यामुळे चर्चेत राहण्यासाठी वडेट्टीवार यांच्यासारखे काँग्रेसी नेते अशा प्रकारची वक्तव्ये करून गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न करतात,’ असा टोलाही गडकरी यांनी लगावला आहे.