Loksabha 2019 : नरेंद्र मोदी घटनाद्रोही , त्यांना सत्ताभ्रष्ट करा : शरद पवार यांचे मतदारांना आवाहन

‘पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर मोदींनी शपथेसह घटनेशीही द्रोह केला. त्यांना सत्ता हातात ठेवण्याचा अधिकार नाही. सत्ता हिसकावून घेऊन त्यांना जागा दाखवून देण्याची वेळ आली आहे. मतदारांनी निवडणुकीतून हे काम करावे,’ असे आवाहन राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केले. मार्केट यार्ड येथील रामकृष्ण हॉलमध्ये मंगळवारी संध्याकाळी आयोजित केलेल्या महाआघाडीच्या संयुक्त मेळाव्यात ते बोलत होते.
यावेळी बोलताना पवार यांनी मोदींवर हल्लाबोल केला. ते म्हणाले, ‘आजवर या देशातील एकाही पंतप्रधानाने द्वेषभावनेतून कोणावर वैयक्तिक टीका केली नाही. मोदी जिथे जातील तिथे विरोधी नेत्यांवर टीका करतात. संस्थांची प्रतिष्ठा राखण्याची खबरदारी त्यांनी घेतली नाही. गांधी घराण्यावर ते नेहमीच टीका करतात. मात्र, गांधी घराण्याने देशासाठी वैयक्तिक बलिदान दिले. मोदींच्या द्वेषबुद्धीमुळे दुसरी अपेक्षा कशी करणार? ‘ना खाउंगा ना खाने दुंगा,’ हे वचन मोदींनी पाळले नाही. याचे उत्तम उदाहरण म्हणजे राफेल विमान खरेदी घोटाळा आहे. या विमानाची किंमत ३५० कोटी रुपयांवरून १६६० कोटी रुपयांवर गेली. सरकारने संसदेत याची माहिती दिली नाही. फाइल चोरीस गेल्याचे त्यांनी सुप्रिम कोर्टात सांगितले. आजवर याबाबत पोलिसांत तक्रार का दाखल केली नाही? नक्कीच दाल में कुछ काला है.’ राफेल करारातील रिलायन्सचा समावेश, नोटाबंदी, काळा पैसा, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, आरक्षण, स्वायत्त संस्थांमधील सरकारचा हस्तक्षेप या मुद्यांवरून पवार यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. वर्ध्यातील मोदींच्या भाषणाबद्दल बोलताना खासदार पवार म्हणाले, ‘दुष्काळ आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलण्याऐवजी मोदी आमच्या कुटुंबावर बोलले. माझी आई कोल्हापुरातील होती. त्यामुळे आमच्यावर पंचगंगेच्या पाण्याचे संस्कार आहेत. घर सांभाळण्यात कोल्हापूरच्या कन्येचा कोणीच हात धरू शकत नाही. मोदींनी पवार कुटुंबाची चिंता करू नये. राष्ट्रवादी हा लक्षावधी लोकांनी उभा केलेला पक्ष आहे. पक्षातील पुढील पिढीवरही असेच संस्कार आहेत.’ पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे नावही घेण्याचे त्यांनी टाळले. ‘जे ते बोलतात ते कधी खरे होत नाही,’ असे म्हणत त्यांनी पालकमंत्र्यांचा उल्लेख टाळला.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, ‘ही निवडणूक देशपातळीवरील मुद्यांवर आहे, त्यामुळे स्थानिक मतभेदांच्या पलिकडे जाऊन काम करण्याची गरज आहे. एकमेकांची गंमत बघत बसण्याची ही वेळ नाही. आपले मतभेद नंतर बघू. महागाई, बेरोजगारी असे महत्त्वाचे मुद्दे बाजूला ठेवून विरोधक देशभक्तीचा आव आणत आहेत. मोदींना सत्तेतून खाली खेचण्याची ताकद शरद पवार यांच्यातच आहे, त्यामुळे चंद्रकांत पाटील पवारांवर टीका करतात. त्यांनी कोल्हापुरातील स्वत:चे घर सांभाळले तरी भरपूर झाले.’ यावेळी हातकणंगलेचे उमेदवार राजू शेट्टी, कोल्हापूरचे उमेदवार धनंजय महाडिक, कॉँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष पी. एन. पाटील. जिल्हाध्यक्ष प्रकाश आवाडे, ए. वाय पाटील आदी उपस्थित होते.