NagpurZpElectionUpdate : नागपूर जिल्हा परिषदेत काँग्रेसची बाजी, शिवसेनेला एकही जागा नाही

नागपूर : जिल्हा परिषदेच्या १६ जागांपैकी काँग्रेसने ९ जागांवर दणदणीत विजय मिळवत नागपूर जिल्हा परिषदेत काँग्रेसने बाजी मारली आहे. आहे. काँग्रेसला मिळालेल्या या मोठ्या विजेमुळे काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला आहे. त्यावर आपली प्रतिक्रिया देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी, ‘स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात. त्यामुळे हा विजय कॉंग्रेस कार्यकर्त्यांचा विजय असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.
नागपूर जिल्हा परिषदेच्या १६ व पंचायत समितीच्या ३१ जागांसाठी झालेल्या सर्व जागांचे निकाल जाहीर झाले असून काँग्रेसने जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत विजय मिळवला आहे. तर, राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याच जिल्ह्यात भाजपला मोठा धक्का बसला असून जिल्हा परिषदेत भाजपला केवळ ३ जागांवर विजय मिळवता आला आहे आहे.
गडकरी फडणवीस या दोन दिग्गज नेत्यांमुळे नागपूर ही भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र, असे असतानाही भाजपला केवळ ३ जागांवर समाधान मानावे लागले आहे . त्यातल्या त्यात भाजपचे यश म्हणजे राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांच्या जागा मात्र भाजपच्या हाती लागल्या आहेत.
निकाल असे आहेत
नागपूर जिल्हा परिषदेत काँग्रेसला ९ जागा मिळाल्या असून गेल्या निवडणुकीच्या तुलनेत त्यांना दोन जागा अधिक मिळाल्या आहेत. भाजपने गेल्या निवडणुकीच्या तुलनेत एक जागा गमावली आहे. गेल्या निवडणुकीत भाजपला ४ जागा मिळाल्या होत्या तर, यंदा ३ जागांवर भाजपला समाधान मानावे लागत आहे. दरम्यान यावर प्रतिक्रिया देताना भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे कि , महाविकास आघाडी एकत्र लढल्याने त्यांना हे यश मिळाले असल्याचे दिसत आहे.
एकूण जागा : १६, भाजप- ०३, शिवसेना- ००, राष्ट्रवादी- २, काँग्रेस- ९, शेकप – ०१, गोंडवाना गणतंत्र पार्टी- ०१
हा विजय कॉंग्रेस कार्यकर्त्यांचा : नाना पटोले
राज्यातील सहा जिल्ह्यांमध्ये झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती पोटनिवडणुकांमध्ये काँग्रेसने मुसंडी मारल्याचे चित्र स्पष्ट झाल्यांनतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ‘स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात. त्यामुळे हा विजय कॉंग्रेस कार्यकर्त्यांचा विजय आहे’, असे म्हटले आहे. त्यांनी यानिमित्ताने पुन्हा एकदा काँग्रेसला राज्यात नंबर एकचा पक्ष बनवण्याचा निर्धार बोलून दाखवला. ‘काँग्रेस हा पक्ष खऱ्या अर्थाने तळागाळातला पक्ष आहे. जनसामान्यांचा पक्ष आहे. कुणाला तरी तिसऱ्या माणसाला समोर उभे करायचे आणि मग तिहेरी लढतीत सहज निवडून यायचे , असले राजकारण काँग्रेसने कधीही केले नाही. म्हणून पुन्हा एकदा महाराष्ट्रात काँग्रेस हाच एक नंबरचा पक्ष होईल’, असे पटोले म्हणाले.
सगळे काही आम्ही सर केले असे लगेच म्हणणार नाही पण त्या दिशेने वाटचाल…
काँग्रेसच्या काही चुका झाल्याही असतील पण त्या दुरुस्त करून आम्ही जनतेपुढे जाऊ. त्याची सुरुवात आम्ही केली आहे. सगळे काही आम्ही सर केले असे लगेच म्हणणार नाही पण त्यादिशेने वाटचाल सुरू झाली आहे, असा विश्वास पटोले यांनी व्यक्त केला. कोणी काय बोलावे हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. त्याच्या तोंडाला लागण्याची गरज नाही. आम्ही लोकशाही मानणारे आहोत, आम्ही काही ईडी आणि सीबीआय चौकशा लावणारे लोक नाही. आमच्याविरोधात बोललात तर तुमचं चॅनेल बंद करून टाकू, तुमच्यामागे ईडी, सीबीआय लावू, ही आमची प्रवृत्ती नाही, असे सांगताना भाजपचे उलटे दिवस सुरू झाले आहेत, असे पटोले म्हणाले. भाजपचे शेतकरी-कामगार विरोधी असंवैधानिक धोरण आणि भाजप सरकारच्या देश विकण्याच्या वृत्तीला कॉंग्रेसच थांबवू शकते हे जनतेचे मत आहे, हे आता दिसून येत आहे, असेही पटोले यांनी सांगितले.
पटोले पुढे म्हणाले कि , ‘मला पाठीमागून वार करता येत नाहीत. माझी लढाई मी नेहमीच समोरून लढलो. माझा आतापर्यंतचा इतिहास असाच आहे. मी लपून छपून काहीही केलेले नाही आणि करणार नाही’.