SolapurNewsUpdate : पोलिसांनी ठरवले तर ते काहीही करू शकतात !! …आता हेच पहाना पोलिसांनी काय केले ?

सोलापूर : प्रेमात ओनर किलिंगमुळे अनेकांचे जीव जातात . कधी घरच्यांचा विरोध आहे म्हणून प्रेमी युगल आत्महत्येसारखा मार्ग निवडतात , कोणी धाडस करून पळून जातात तर कोणी आपल्या प्रेमाचा त्याग करून एकमेकांचा निरोप घेणेच पसंत करतात पण सोलापूर जिल्ह्यात घडलेली हि घटना प्रेम भावनेला फुंकर घालणारी आहे यात वाद नाही . थोडक्यात काय तर पोलिसांनी ठरवले तर ते काहीही करू शकतात याची प्रचिती आणून देणारी हि घटना आहे.
त्याचे असे झाले कि , आपल्या प्रेयसीला लग्नाचे अभिवाचन दिलेला प्रियकर आपला वादा निभावत नसल्याने धाडस करून हि प्रेयसी थेट पोलीस ठाण्यात गेली आणि आपली प्रेम कहानी थेट पोलीस निरीक्षक साहेबांना सांगितली. या प्रकरणातील तिच्या खंबीरपणाची गांभीर्याने दखल घेऊन पोलीस निरीक्षक प्रदीप काळे यांनी संबंधित प्रियकराशी पोलीस ठाण्यात पाचारण करून हकीकत जाणून घेतली तेंव्हा प्रियकराने सांगितले कि , त्यांच्या आंतरजातीय विवाहाला घरच्या मंडळींचा विरोध असल्यामुळे त्यांना लग्न करता येत नाही. दरम्यान कारण समजताच पोलीस निरीक्षक काळे यांनी प्रियकर व त्याच्या घरच्या मंडळींचे समूपदेशन केल्यामुळे त्यांनी या लग्नाला तयारी दर्शविताच अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्यातच या प्रेमी युगुलांचा विवाह लावून देण्यात आला.
हि “प्रेम कहानी ” अशी आहे कि , अक्कलकोट तालुक्यातील मैंदर्गी गावात राहणारा सचिन हा बांधकामावर गवंडी म्हणून काम करतो. त्याच गावात राहणारी यल्लव्वा ही देखील बांधकामावर बिगारी म्हणून मजुरी करते. बांधकाम करीत असताना सचिन व यल्लव्वा यांचे प्रेम जुळले. दोघांनीही लग्न करण्याची शपथ घेतली होती.मात्र सचिन याने लग्नाला नकार दिला. मात्र खचून न जाता आपले प्रेम मिळविण्यासाठी यल्लव्वाने थेट अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाणे गाठले. पोलीस निरीक्षक प्रदीप काळे यांची भेट घेऊन त्यांच्या कानावर आपली प्रेम कहानी टाकली त्यानंतर पोलिसांनी सचिनला बोलावून घेतले. तेंव्हा त्याने आपली आपबिती सांगितली. त्यावर पोलीस निरीक्षक काळे यांनी त्यांचे समुपदेशन केले आणि विवाहासाठी तयार केले.
दरम्यान बातमी इथेच संपली नाही तर सचिन लग्नाला तयार झाल्यानंतर पोलीस निरीक्षक काळे यांनी पोलीस ठाण्यालाच विवाह स्थळात बदलले आणि लग्न लावण्याचा निर्णय घेतला. लगोलग लग्नाची तयारी झाली. सोन्याचे दागिने, मंगळसूत्र, चांदीचे जोडवे, पैठणी, साडी, नवरदेवालाही पोशाख, बूट तसेच संसारासाठी भांडी आदी सर्व साहित्य जमा झाले. भटजीही आले. नवरा-नवरीला मुंडावळ्या बांधल्या. मुलीचे कन्यादान स्वत: पोलीस निरीक्षक प्रदीप काळे यांनीच केले. अन् भोजनानंतर दोघा वधुवरास खास वाहनातून त्यांच्या गावी मैंदर्गीला पाठविण्यात आले.