MharashtraNewsUpdate : मोठी बातमी : अखेर आरोग्य विभागाच्या उद्या होणाऱ्या परीक्षा रद्द | MahanayakOnlineEffect

मुंबई : अखेर राज्यातील आरोग्य विभागाच्या उद्या शनिवारी होणाऱ्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. परीक्षे घेणाऱ्या एजन्सीच्या प्रतापामुळे परीक्षार्थीना मनस्ताप सहन करावा लागत आहे. आरोग्य विभागातर्फे ‘क’ आणि ‘ड’ विभागासाठी या परीक्षा घेण्यात येणार होत्या त्या परीक्षा आजच्या निर्णयामुळे तात्पुरत्या स्थगित करण्यात आल्या आहेत. या परीक्षेतील घोळाची माहिती ‘महानायक ऑनलाईन’ ने राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या कानावर काल रात्री उशिरा ते नांदेड दौऱ्यावर असताना घातली होती.
दि . २५ आणि २६ सप्टेंबरला आरोग्य विभागातील क आणि ड वर्गातील ६२०० पदांसाठी राज्यात परीक्षा घेतली जात होती . यासाठी तब्बल ८ लाख विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत. ‘न्यासा’ या खासगी एजन्सीला या भर्तीचे कंत्राट दिल्याची माहिती समोर आली आहे. सदर भरती प्रक्रिया अत्यंत नियोजनबद्ध आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडली जात आहे. क आणि ड आरोग्य विभागाच्या स्थगित करण्यात आलेल्या परीक्षा पुन्हा कधी घेण्यात येणार य़ाबाबत सध्या कोणतीही माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आलेली नाही. फक्त आरोग्य विभागाची उद्या होणारी परीक्षा रद्द झाल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
दरम्यान आरोग्य विभागाच्या सावळ्यागोंधळामुळे परीक्षा रद्द करण्याची नामुष्की आल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. आरोग्य विभागाच्या क गटातील २७३९ आणि ड गटातील ३४६६ जागांसाठी ही भरती करण्यात येणार आहे. राज्यातील १५०० केंद्रांवर ही परीक्षा घेतली जाणार असल्याची माहिती मिळाली होती. मात्र ही परीक्षा तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे.