MaharashtraPoliticalUpdate : मोठी बातमी : राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्मच काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून !! शिवसेनेचे ज्येष्ठ नेते अनंत गीते यांचा घणाघात…

रायगड : ‘राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्मच काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून झाला आहे मग आम्ही त्यांच्या विचाराचे कसे होऊ शकतो? आम्ही आघाडी सैनिक नाही, शिवसैनिक आहोत आणि शिवसैनिकच राहणार. दुसरा कुठलाही नेता आपला होऊ शकत नाही. त्यांना कितीही उपाध्या मिळो. कोणी त्यांना ‘जाणता राजा’ म्हणो, तो आमचा गुरू होऊ शकत नाही. आमचे गुरू फक्त बाळासाहेब ठाकरे,’ असा घणाघात शिवसेनेचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी केला आहे. विशेष म्हणजे भाजपनेही शरद पवार यांच्याबाबतीत ” खंजीर ” या शब्दाचा प्रयोग केला होता मात्र शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते खा. संजय राऊत यांनी पवारांच्या बचावात पुढे येत असा कुठलाही पुरावा नसल्याचे सांगत भाजपाला टोलावले होते. त्यातच स्वतः शिवसेनेच्या नेत्यानेच असे उदगार काढून खळबळ उडवून दिली आहे.
राज्यात भाजप तर भाजप पण महाविकास आघाडीतील नेतेही प्रसंगी एकमेकांवर कुरघोडी करताना दिसत आहेत त्यामुळे आघाडीमध्ये फार काही सख्य असल्याचे चित्र नाही हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. त्यातच माजी केंद्रीय मंत्री व शिवसेना नेते अनंत गीते यांनी रायगडमध्ये केलेल्या या वक्तव्यावरून मोठी खळबळ उडणार हे निश्चित. यावेळी बोलताना ‘शिवसैनिकांनी आघाडीचा विचार करू नये. फक्त आपले घर सांभाळावे,’ असे थेट आवाहन गीते यांनी केले आहे. ‘आघाडी ही फक्त सत्तेसाठी झालेली तडजोड आहे. शरद पवार हे शिवसैनिकांचे गुरू होऊ शकत नाहीत,’ असे ही त्यांनी अप्रत्यक्षपणे म्हटले आहे.
खा . संजय राऊत यांची प्रतिक्रिया
दरम्यान मुख्यमंत्री अनंत गीते यांच्या या धक्कादायक विधानावर शिवसेनेकडून शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार हे देशाचे नेते आहेत, असे म्हणत त्यांनी गीतेंच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली. महाराष्ट्रातली व्यवस्था ही तीन पक्षांची एकत्र असलेली व्यवस्था आहे. शरद पवार हे देशाचे नेते आहेत. शरद पवार असतील, काँग्रेस असेल किंवा उद्धव ठाकरे यांनी एकत्र बसून ठरवले आहे. सरकार बनवायचे आणि चालवायचे … मला वाटतं हे सरकार ५ वर्ष चालेल आणि या व्यवस्थेला संपूर्ण महाराष्ट्राची मान्यता आहे”, असे संजय राऊत म्हणाले.
काय काय म्हणाले अनंत गीते ?
रायगड येथे शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. स्थानिक पातळीवर शिवसेना व राष्ट्रवादीमध्ये असलेल्या मतभेदांचे प्रतिबिंब त्यांच्या भाषणात पडले. गीते यांनी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसवर थेट टीका केली. ‘मुख्यमंत्री आपले आहेत म्हणून हे सरकार आपलं म्हणायचं, पण काँग्रेस-राष्ट्रवादी हे काही आपले नाहीत. हे आघाडीचं सरकार आहे. शिवसेनेचं नाही. सरकार आघाडी सांभाळेल. सत्ता आघाडीचे नेते सांभाळतील. तुमची, माझी आणि शिवसैनिकाची जबाबदारी गाव सांभाळण्याची आहे. ते करताना आघाडीचा विचार करायचा नाही. फक्त शिवसेनेचा विचार करायचा आहे,’ असे गीते यांनी सांगितले.
‘राज्यातील महाविकास आघाडीत तीन घटक पक्ष आहेत. त्यात दोन काँग्रेस आहेत. एक काँग्रेस आणि दुसरी राष्ट्रवादी काँग्रेस. दोन्ही काँग्रेसच. पण हे कधी एकमेकांचं तोंड बघत होते का? ह्याचं एकमेकांचं जमतं का? ह्यांचा विचार एक आहे का? दोन काँग्रेस एका विचाराच्या होऊ शकत नाहीत, तर शिवसेना काँग्रेसच्या विचाराची कदापि होऊ शकत नाही,’ असेही त्यांनी ठणकावून सांगितले.
आघाडी ही सत्तेची तडजोड आहे
दरम्यान ‘आघाडी ही सत्तेची तडजोड आहे. आहे तोपर्यंत आहे. ती तुटू नये, पण तुटेल त्या दिवशी काय? त्या दिवशी तुम्ही तटकरेंच्या घरी जाणार का? आपल्याच घरी येणार ना? मग त्यासाठी आपलं घर टिकवायचं की नाही? म्हणून आपली ताकद वाढवायची आहे. तुम्हाला आघाडीचा विचार करण्याची अजिबात आवश्यकता नाही. राज्यात काय करायचं ते नेते बघून घेतील. आपल्याला आपली पंचायत समिती, जिल्हा परिषद सांभाळायची आहे,’ असे मार्गदर्शनही गीते यांनी केले.
कोण आहेत अनंत गीते?
अनंत गीते हे रायगडमधील शिवसेनेचे बडे नेते आहेत.२०१४ मध्ये मोदी सरकारच्या कॅबिनेटमध्ये ते केंद्रीय अवजड उद्योगमंत्री होते. २०१४ साली अनंत गीते यांनी राष्ट्रवादीचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना रायगडमध्येच पराभूत केले होते. त्यावेळी अनंत गीते हे केवळ २१०० मतांनी विजयी झाले होते. मात्र २०१९ मध्ये सुनील तटकरे यांनीच अनंत गीते यांना पराभूत करुन विजय मिळवला होता.
हा तर सूर्यावर थुंकण्याचा प्रकार : सुनील तटकरे
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्याबाबतीत असे उद्गार काढल्याबद्दल राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांनी अनंत गीते यांना उत्तर देताना त्यांचे हे वक्तव्य म्हणजे हा सूर्यावर थुंकण्याचा प्रकार असल्याची टीका केली. शरद पवार हे देशाचे नेते आहेत. त्यांच्या पुढाकारातूनच महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आले . राज्याचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे चांगल्या पद्धतीने कार्य करीत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखालीच सरकार पाच वर्षाचा कालावधी पूर्ण करेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. गीते हे राजकीय नैराश्यातून असे बोलत आहेत. त्यामुळे आम्ही त्यांच्या वक्तव्याची आम्ही कुठलीही दाखल घेत नाही. रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात कुठलेही मतभेद नाहीत आम्ही मिळूनच काम करतो. गीते यांच्या वक्तव्याचा मी निषेध करतो असेही ते पत्रकारांशी बोलताना म्हणाले.
शरद पवार देशाचे नेते : खा. संजय राऊत
दरम्यान मुख्यमंत्री अनंत गीते यांच्या या धक्कादायक विधानावर शिवसेनेकडून शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी गीतेंच्या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार हे देशाचे नेते आहेत, असे म्हणत त्यांनी गीतेंच्या वक्तव्यावर एकप्रकारे नाराजी व्यक्त केली. आज संजय राऊत यांनी राजधानी नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर पत्रकारांशी संवाद साधला. अनंत गीते यांच्या पवारांवरील टीकेवर पत्रकारांनी प्रश्न विचारताच, त्यांनी मला गीतेंचं वक्तव्य माहिती नाही, असे म्हणत त्याच्यावर बोलण्यास टाळाटाळ केली. मात्र पत्रकारांनी याच विषयावर बोलण्याच्या आग्रह धरल्यावर त्यांनी नाराजीच्या सुरातच गीतेंवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला.