PanjabNewsUpdate : पंजाबच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावासाठी चालू आहे खल

चंदीगड : कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता नवीन मुख्यमंत्री कोण होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मुख्यमंत्रिपदासाठी प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांच्यासह पंजाब काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष सुनील जाखड़, माजी मंत्री सुखजिंदर सिंग रंधावा, तृप्त राजिंदर सिंह बाजवा आणि राज्यसभा सदस्य प्रताप सिंह बाजवा यांची नावे चर्चेत आहेत. पक्षाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेस लेजिस्लेटिव्ह पार्टीच्या बैठकीनंतर पुढील मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे. हरीश रावत, अजय माकन आणि नवज्योतसिंग सिद्धू एका हॉटेलमध्ये मुख्यमंत्र्यांच्या नवीन नावांवर विचारमंथन करत आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीनंतर दोन उपमुख्यमंत्र्यांची नावेही जाहीर केली जाऊ शकतात आणि शपथविधी सोहळा सोमवारी होण्याची शक्यता आहे. शनिवारी संध्याकाळी झालेल्या बैठकीत पंजाब काँग्रेसच्या आमदारांनी पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांना राज्याच्या पुढील मुख्यमंत्रीपदाची निवड करण्याची विनंती करणारा ठराव एकमताने मंजूर केला होता. ही बैठक राहुल गांधी यांच्या नवी दिल्लीतील निवासस्थानी झाली.
यांच्या नावाची चालू आहे चर्चा
मुख्यमंत्रिपदासाठी प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांच्यासह सुनील जाखड, सुखजिंदरसिंग रंधावा यांची नावं आघाडीवर आहेत. याशिवाय पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये अंबिका सोनी, तृप्त राजिंदर सिंग बाजवा, ब्रह्म मोहिंद्रा, विजय इंदर सिंगला, पंजाब काँग्रेसचे कार्याध्यक्ष कुलजीत सिंह नागरा आणि खासदार प्रताप सिंह बाजवा यांच्या नावाची देखील चर्चा आहे. उपमुख्यमंत्री पदासाठी जे नाव समोर येतंय ते आहे काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार राजकुमार वेरका. त्यांना उपमुख्यमंत्री पद देण्यात आल्यास ते मागास समाजाचे प्रतिनिधित्व करतील.
काँग्रेसचे केंद्रीय निरीक्षक अजय माकन आणि हरीश चौधरी आणि राज्य प्रभारी हरीश रावत यांच्या उपस्थितीत, विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत ठराव संमत करून सोनिया गांधींना नवीन नेता निवडण्याचे अधिकार देण्यात आले. यासोबतच अमरिंदर सिंग यांच्या योगदानाचे कौतुक करण्यात आले आणि आणखी एक ठराव मंजूर करून त्यांचे आभार मानले गेले.
दरम्यान अमरिंदर सिंग यांनी सिद्धू यांच्या नावाला कडाडून विरोध केला आहे. सिद्धूंचा पाकिस्तानशी संबंध असल्याचा आरोप केला. सिद्धू मुख्यमंत्री झाल्यास पंजाबचं वाटोळं होईल, असे अमरिंदर सिंग यांनी म्हटले आहे. यापूर्वी काँग्रेसच्या ५० हून अधिक आमदारांनी पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांना पत्र लिहून अमरिंदर सिंग यांना मुख्यमंत्रिपदावरून हटवण्याची मागणी केली होती. या पत्रानंतर काँग्रेस हायकमांडने विधिमंडळ पक्षाची बैठक घेण्याचे निर्देश दिले होते. राजीनामा देण्यापूर्वी अमरिंदर सिंग यांनी त्यांच्या निवासस्थानी आमदार समर्थकांची बैठक घेतली होती.