CoronaIndiaUpdate : सावधान : सणावारात स्वतःला आणि कुटुंबियांना सांभाळा , येत्या तीन महिन्यात आहे डेल्टा व्हेरिएंटचा धोका !!

नवी दिल्ली : गेल्या २४ तासांत कोरोनाचे ३५,६६२ नवे रुग्ण आढळून आले आहेत. सध्या देशात सणांचे वातावरण असले तरी येत्या तीन महिन्यांत डेल्टा व्हेरिएंटचा मोठा धोका असल्याने नागरिकांनी अधिक काळजी घेण्याची गरज आहे . कारण कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल चार लाखांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. जगभरात कोरोनाच्या लाटेने आतापर्यंत तब्बल २२ कोटी ८५ लाख ३४ हजार ९६४ लोकांना बाधित केले असून ४६ लाख ९५ हजार २३० लोकांचा बळी घेतला आहे. तर देशातील ३ कोटी ३४ लाख १७ हजार ३९० लोकांना कोरोनाने ग्रासले असून आतापर्यन्त ४ लाख ४४ हजार ५६३ लोकांचा कोरोनाने जीव घेतला आहे. जगात भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे.
या पार्श्वभूमीवर तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या तीन महिन्यांत अनेक सण येत असून यानिमित्ताने सर्वत्र मोठी गर्दी होण्याची तसेच लोकांची घराबाहेर पडण्याची शक्यता आहे. परिणामी देशभरात पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात कोरोनाचा संसर्ग वाढू शकतो. त्यामुळे या काळात लोकांनी अत्यंत सतर्क राहणे आणि बाहेर गर्दी न करता घरच्या घरीच सण साजरे करणेच सर्वांच्या हिताचे आहे.
देशातील तज्ज्ञांच्या मतानुसार ऑक्टोबर ते नोव्हेंबरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढू शकते. यातच डेल्टा व्हेरिएंट देखील थैमान घालून शकतो. जर लोकांनी सणसमारंभामध्ये कोरोना नियमावलीचे पालन केले नाही तर परिस्थिती आणखी बिघडू शकते. दरम्यान जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) दिलेल्या माहितीनुसार गेल्या आठवड्यात जगभरात नोंदवण्यात आलेल्या कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. मागील दोन महिन्यांच्या काळात पहिल्यांदा झालेली ही मोठी घट आहे. जगातील सर्वच भागांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली आहे. तसेच बळींच्या संख्येतही घट झाली आहे.तरीही काळजी घेण्याची गरज आहे.