MumbaiNewsUpdate : आयकर विभागाच्या मते सोनू सूदकडून २० कोटींहून अधिक करचोरी …

मुंबई, : लॉकडाऊन काळात अडचणीत सापडलेल्या लोकांच्या मदतीसाठी धावणाऱ्या सोनू सूदवर आयकर विभागाने धाडी टाकून सोनू सूदला अडचणीत आणले आहे. आयकर विभागाने याबाबत दिलेल्या माहितीनुसार सोनू सूदचा २० कोटींहून अधिक करचोरी केली आहे. अभिनेता सोनू सूदच्या चॅरिटी फाउंडेशनने देशाबाहेरील देणगीदारांकडून २.१ कोटी गोळा केले आहेत. यात एफसीआरए नियमांचे उल्लंघन झाल्याचा प्रकार घडला आहे. हे प्रकरण लवकरच सीबीआयकडे जाण्याची शक्यता आहे. गृहमंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार, एफसीआरएच्या १ कोटीपेक्षा जास्त उल्लंघनाची चौकशी सीबीआयकडून केली जाते.
दरम्यान एनडीटीव्ही इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, अभिनेता सोनू सूदवर आयकर विभागाच्या छापेमारीनंतर केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) म्हटले आहे की, त्याच्याविरोधात २० कोटी रुपयांपेक्षा जास्त कर चोरीचे प्रकरण समोर आले आहे. सीबीडीटीने अशी माहिती दिली आहे की, अभिनेता सोनू सूद आणि त्याच्या सहकाऱ्यांच्या ठिकाणी घेतलेल्या शोधादरम्यान करचुकवेगिरीशी संबंधित पुरावे सापडले आहेत. सीबीडीटीने अशी माहिती दिली आहे की अभिनेत्याने बनावट संस्थांकडून बनावट आणि असुरक्षित कर्जाच्या स्वरुपात बेहिशोबी रक्कम जमा केली होती.
सीबीडीटीने दिलेल्या माहिनुसार, सोनूच्या विविध ठिकाणांवर छापेमारीची कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये मुंबईतील काही ठिकाणांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे आयकर विभागाने इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटमधील लखनऊ स्थित औद्योगिक समुहावर देखील छापेमारी आणि जप्तीची कारवाई केली आहे. एकूण ३ दिवसांपासून ही छापेमारी सुरू असून साधारण २८ ठिकाणांवर ही छापेमारी करण्यात आली. यामध्ये मुंबई, लखनऊ, कानपूर, जयपूर, दिल्ली आणि गुरुग्राममधील ठिकाणांचा समावेश आहे.
सोनुवरील आरोपांनुसार, करोनाच्या पहिल्या लाटेदरम्यान गेल्या वर्षी जुलैमध्ये स्थापन केलेल्या त्याच्या ना-नफा सूद चॅरिटी फाउंडेशनने यावर्षी एप्रिल महिन्यापर्यंत १८ कोटींपेक्षा जास्त देणगी गोळा केली होती. त्यापैकी १.९ कोटी रुपये त्याने लोकांची मदत करण्यासाठी खर्च केले आणि उर्वरित १७ कोटी रुपये त्याच्या बँक खात्यात आहेत.
“लखनऊमधील एका इन्फ्रास्ट्रक्चर ग्रुपच्या विविध परिसरातीस रिअल इस्टेट प्रोजेक्टमध्ये सोनुने मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. याठिकणी कर चोरी आणि पुस्तकांमधील अनियमित नोंदीशी संबंधित पुरावे सापडले आहेत. लखनऊच्या ग्रूपने बोगस बिलांच्या आधारे निधी वळवून गुंतवणूक केली आहे. आतापर्यंत अशा ६५ कोटींच्या बोगस कराराचे पुरावे सापडले असून १.८ कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे,” असंही आयकर विभागाने आज म्हटले आहे.