PoliticalNewsUpdate : बाबुल सुप्रियो यांचा पश्चिम बंगालमध्ये भाजपला मोठा दणका

कोलकाता : दोन महिन्यांपूर्वी राजकीय जीवनातून संन्यास घेत भाजपला सोडचिठ्ठी देण्याची घोषणा करणारे माजी केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो यांनी पश्चिम बंगालमध्ये भाजपला मोठा दणका दिला असून आज अचानक त्यांनी तृणमूल काँग्रेसचा झेंडा हातात घेतला आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे भाचे आणि तृणमूलचे राष्ट्रीय महासचिव – लोकसभा खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी सुप्रियो यांना तृणमूलचे सदस्यत्व दिले आहे . या दरम्यान तृणमूलचे राज्यसभा खासदार डेरेक ओब्रायन यांची उपस्थिती होती. विशेष म्हणजे बाबुल सुप्रियो हे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे कट्टर विरोधी म्हणून ओळखले जात होते. त्यातच या नाट्यमय घडामोडी घडल्या आहेत.
प्रसिद्ध पार्श्वगायक असणाऱ्या बाबुल सुप्रियो यांनी भाजपमध्ये प्रवेश करून आपली राजकीय कारकीर्द सुरु केली होती मात्र, नरेंद्र मोदी यांनी त्यांना सरकारमधून डच्चू दिल्यानंतर एका फेसबुक पोस्टच्या माध्यमातून त्यांनी आपल्यामनातील दु:ख त्यांनी व्यक्त करून विधानसभा निवडणुकीनंतर त्यांनी भाजप नेतृत्वावर नाराजी व्यक्त केली होती. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत पक्षाने बाबुल सुप्रियो यांना टॉलीगंज मतदारसंघातून तिकीट दिले होते मात्र त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. यानंतर काही दिवसांतच केंद्रीय मंत्रिममंडळ विस्तारापूर्वी त्यांच्याकडून केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा मागण्यात आला. तेव्हापासून ते पक्षावर नाराज होते.
Today, in the presence of National General Secretary @abhishekaitc and RS MP @derekobrienmp, former Union Minister and sitting MP @SuPriyoBabul joined the Trinamool family.
We take this opportunity to extend a very warm welcome to him! pic.twitter.com/6OEeEz5OGj
— All India Trinamool Congress (@AITCofficial) September 18, 2021
दरम्यान ३१ जुलै रोजी एक फेसबुक पोस्ट लिहून सुप्रियो यांनी ‘मी जातोय, अलविदा… मी कोणत्याही राजकीय पक्षात प्रवेश करणार नाही. तृणमूल, काँग्रेस,सीपीआय (एम) कुणीही मला बोलावलेले नाही. मी कोणत्याही पक्षात जाणार नाही… सामाजिक कार्य करण्यासाठी राजकारणात असण्याची आवश्यकता नाही’ असे म्हणत राजकारणातून संन्यास घेत असल्याची घोषणा त्यांनी केली होती. पश्चिम बंगालच्या आसनसोल मतदारसंघातून ते भाजपच्या तिकीटावर लोकसभा निवडणुकीत जिंकून खासदार बनले. मंत्रीपदाचा राजीनामा देताना त्यांनी खासदार पदाचाही राजीनामा देण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, काही वेळातच त्यांनी आपला हा निर्णय फिरवत खासदार पदावर कायम राहून जनतेची सेवा करत राहणार असल्याचे त्यांनी म्हटले होते .