IndiaNewsUpdate : मध्य प्रदेशात नवी शिक्षा नीती , रामायणाबरोबर योग-ध्यान आणि मंत्रोच्चाराचाही अभ्यासक्रमात समावेश

भोपाळ : मध्य प्रदेश सरकारने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना आता रामायण, रामसेतू, महाभारत या विषयांचे धडे शिकवण्याचा निर्णय घेतला आहे. अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही आता त्यांच्या अभ्यासक्रमात ‘रामायण’ हा विषय शिकवा लागणार आहे. तर दर्शन शास्राच्या पहिल्या वर्षाच्या विद्यार्थ्यांना पौराणिक ग्रंथ ‘रामायण’चे धडे देण्याचा निर्णय उच्च शिक्षण विभागाने घेतला आहे.
वृत्त असे आहे कि , मध्य प्रदेशच्या शिवराज सिंह चौहान सरकारने राज्यात जारी केलेल्या अभ्यासक्रमानुसार, ‘रामचरित मानस’ वर आधारित व्यावहारिक ज्ञानाच्या नावावर एक संपूर्ण पेपर विद्यार्थ्यांना सोडवावा लागणार आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना ‘रामचरित मानस’शी निगडीत आदर्शांचे धडे दिले जातील. श्रीरामाच्या पितृभक्तीसहीत इतर गुणांचाही पाठ्यक्रमात समावेश करण्यात आला आहे.
योग-ध्यान आणि मंत्रोच्चारही शिकवला जाईल…
विशेष म्हणजे महाविद्यालयात पहिल्या वर्षाला पदवी शिक्षणाच्या अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना महाभारत, रामचरित मानस याशिवाय मंत्रोच्चार, योग आणि ध्यान यांसारखे विषय शिकवले जाणार आहेत. नव्या अभ्यासक्रमानुसार, इंग्रजीच्या फाउंडेशन कोर्समध्ये पहिल्या वर्षाच्या विद्यार्थ्यांना सी राजगोपालचारी यांच्या महाभारताची प्रस्तावना शिकवली जाईल.
दरम्यान काँग्रेसकडून मात्र शिवराज सरकारच्या या निर्णयाला आक्षेप घेण्यात आला असून काँग्रेसला उत्तर देताना आमचा गौरवाशाली इतिहास विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी हा कोर्स तयार करण्यात आला आहे. यामध्ये कुणी का आक्षेप घ्यावा? असा प्रश्न राज्याचे उच्च शिक्षण मंत्री मोहन यादव यांनी केला आहे.
रामचरित मानसचा अभ्यास करणे यात काहीही वाईट नाही. स्वदेशी शिक्षण प्रणाली आणि नव्या शिक्षण नीतीसह हा अभ्यासक्रम लागू करण्यात येणार आहे. मग याला तुम्ही भगवाकरण म्हणा अथवा आणखी काही… आमच्या नव्या शिक्षण नीतीत नव्या कोर्ससाठी दाखल्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ज्या विद्यार्थ्यांनी श्रीरामाच्या चरित्राविषयी आणि कामाविषयी जाणून घ्यायचं असेल ते पाठ्यपुस्तकांद्वारे याचा अभ्यास करू शकतात. गजलच्या स्वरुपात उर्दूही शिकवली जाणार आहे. हा एक स्वैच्छिक विषय असेल. विद्यार्थी आपल्या मर्जीनुसार अभ्यास करू शकतील. यामध्ये कुणाला आक्षेप नसावा, असेही उच्च शिक्षण मंत्री डॉ. मोहन यादव यांनी म्हटले आहे.