MaharashtraRainUpdate : राज्यात काय आहे पावसाची स्थिती जाणून घ्या…

पुणे : हवामान विभागाने दिलेल्या वृत्तानुसार बंगालच्या उपसागरात आणि गुजरात परिसरात निर्माण झालेल्या हवेच्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे गेल्या आठवड्यात राज्यात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणांना पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. गेल्या आठवडाभरात झालेल्या मुसळधार पावसामुळे मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. यानंतर आता राज्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. पुढील पाच दिवस राज्यात सर्वत्र कोरड्या हवामानची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हवामान खात्याने राज्यात आज केवळ दोन जिल्ह्यांत पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली असून पालघर आणि नंदुरबार या दोन जिल्ह्यांना आज येलो अलर्ट दिला आहे. पुढील चोवीस तासांत या दोन जिल्ह्यात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. दरम्यान याठिकाणी मेघगर्जनेसह वेगवान वारे वाहण्याची शक्यता आहे. ३० ते ४० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे हवामान खात्याकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
पालघर आणि नंदुबार हे दोन जिल्हे वगळता राज्यात सर्वत्र कोरड्या हवामानाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकण आणि घाट परिसरात काही ठिकाणी ढगाळ हवामानाची नोंद झाली आहे. तसेच मध्य महाराष्ट्रातही काही ठिकाणी नभ भरून आले आहेत. पण याठिकाणी आज पावसाची शक्यता जवळपास नाहीच. राज्यात हीच स्थिती पुढील पाच दिवस कायम राहणार आहे.
दरम्यान बंगालच्या उपसागरात आणि गुजरातमध्ये निर्माण झालेल्या हवेच्या कमी दाबाचे क्षेत्रामुळे उत्तर कोकण आणि पालघर जिल्ह्यात सरासरी १४० मिलिमीटर पाऊस कोसळला आहे. तर डहाणू १३५, पालघर १२३, वाडा ११८, जव्हार येथे १०७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. ठाणे आणि रत्नागिरीतही जोरदार पाऊस पडला आहे. दरम्यान नाशिक आणि पुण्यासह घाटमाथ्यावर जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. तर महाबळेश्वर येथे १३२ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे.