MaharashtraRainUpdate : राज्यात पुन्हा ४ दिवस पावसाचे , हवामान खात्याचा अंदाज , कुठे तुरळक तर कुठे मुसळधार

मुंबई : गेल्या आठवडाभरापासून राज्यात आठवडाभरापासून मुसळधार पावसाने हजेरी लावल्यामुळे अनेक गावांवर पूर परिस्थिती ओढवली असून सखल भागात पाणी शिरल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, येत्या तीन दिवसांमध्ये पावसाचा जोर आणखी वाढणार असून यामुळे अनेक जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र तीव्र झाल्यामुळे येत्या २४ तासात अतिवृष्टीची शक्यता असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे.
बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र आज तीव्र झाले (WML).येत्या 24 तासात ते आणखी तीव्र (Depression) होण्याची शक्यता IMD ने वर्तवली,तसेच ते आतल्या दिशेने सरकण्याची शक्यता.परीणामी पश्र्चिम किनारपट्टीवर पुढचे ३,४दिवस वारे जोरदार असतील,राज्यात मुसळधार ते अतीमुसळधार पावसाची शक्यता. pic.twitter.com/9W8nixwzHC
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) September 12, 2021
हवामान खात्याच्या अंदाजानुसार पश्चिम किनारपट्टीवर तीन ते चार दिवस जोरदार वारे वाहतील. त्याचबरोबर मुसळधार पावसाची शक्यताही हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. यामुळे कोकण, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर पाहायला मिळेल. इतकंच नाहीतर मुंबई, पालघर, रायगड या ठिकाणी देखील अतिवृष्टीची शक्यता आहे.
दरम्यान पालघर, ठाणे येथे उद्या मंगळवारी पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. तर रायगड, रत्नागिरी, पुणे, कोल्हापूर आणि सातारा या जिल्ह्यांमधील घाट परिसर येथे ऑरेंज अॅलर्ट जारी करण्यात आला आहे. याशिवाय मराठवाड्यातही काही ठिकाणी तुरळक तर काही ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा अंदाज आहे. जालना, परभणी, हिंगोली, नांदेड येथे त्याची तीव्रता थोडी अधिक असू शकते. तसेच विदर्भातही तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
मुसळधार पावसाची शक्यता
हवामान खात्याच्या अंदाजानुसार सिधुदुर्गमध्येही मंगळवारपर्यंत तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर धुळ्यामध्येही उद्या मेघगर्जनेसह वीजांचा कडकडाट आणि मुसळधार पावसाची शक्यता आहे. या काळात वाऱ्याचा वेगही वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. नंदुरबार, जळगावमध्येही मंगळवारी ही स्थिती असू शकेल. मध्य महाराष्ट्रात पुण्यातील घाट परिसरासाठी बुधवारपर्यंत ऑरेंज अॅलर्ट आहे. कोल्हापूर, साताऱ्यातील घाट परिसरासाठी मंगळवारपर्यंत ऑरेंज अॅलर्ट देण्यात आला आहे. या काळात तुरळक ठिकाणी तीव्र मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडू शकतो.