MaharashtraPoliticalUpdate : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका घ्या, प्रकाश आंबेडकर यांचे निवडणूक आयुक्तांना पत्र

मुंबई: नंदूरबार, धुळे, नागपूर, अकोला आणि वाशिम जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. त्यामुळे या पाच जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका घेण्यात याव्यात, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.
प्रकाश आंबेडकर यांनी निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांना ९ ऑगस्ट रोजी पत्रं लिहून ही मागणी केली आहे. नंदुरबार, धुळे, नागपूर, अकोला, वाशिम जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसह स्थानिक स्वराज्य संस्थांतील ओबीसींच्या आरक्षित जागा सुप्रीम कोर्टाने स्थगित केल्या आहेत. त्यामुळे या पाच जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीतील रिक्त जागांवर खुल्या प्रवर्गातून निवडणूका होऊ घातल्या आहेत.
दरम्यान ही निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर पूर्ण होण्यापूर्वीच कोरोनाच्या कारणास्तव मध्येच थांबवण्यात आली आहे. ही प्रक्रिया वेगाने पूर्ण होणे आवश्यक आहे. सध्या या पाच जिल्ह्यात कोरोनाचे प्रमाण कमी झाले आहे. तेव्हा ही प्रलंबित निवडणूक प्रक्रिया वेगाने पूर्ण करावी, अशी मागणी आंबेडकरांनी या पत्राद्वारे केली आहे.