MaharashtraRainUpdate : राज्यात अनेक जिल्ह्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा , औरंगाबादेत जोरदार पाऊस

पुणे : राज्यात आज सकाळपासून मुंबई, ठाणे, पालघर आणि पुणे परिसरात हलक्या पाऊस कोसळत आहे. सायंकाळनंतर याठिकाणी पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहेत. तसेच आजपासून पुढील पाच दिवस कोकण, मराठवाडा , घाट परिसर मध्य महाराष्ट्र आणि पूर्व विदर्भात अनेक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान आज सायंकाळी औरंगाबादेत जोरदार पाऊस झाला आहे.
पुणे शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी पुढील पाचही दिवस राज्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार आजपासून पुण्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आजपासून पुढील पाच दिवस पुण्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तसेच येत्या तीन ते चार दिवसात मराठवाड्यातही पुन्हा पावसाचा जोर वाढण्याचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. या अंदाजानुसार औरंगाबाद जिल्ह्यात काही ठिकाणी दुपारपासून तर काही ठिकाणी संध्याकाळ पासून पावसाला सुरुवात झाली आहे. मंगळवारी या भागात जोरदार वृष्टी होण्याचे संकेत प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांच्यावतीनं जारी करण्यात आले आहेत.
पुढील 3-4 दिवसात महाराष्ट्रात पावसाची वाढ अपेक्षित आहे I Iयेत्या 5 दिवसांत आपेक्षित तीव्र हवामानाचा इशारा I तपशीलवार जिल्हानिहाय हवामान अंदाज व चेतावणीसाठी कृपया https://t.co/JYmdPo98tJ भेट द्या pic.twitter.com/0vjrsJ81Zc
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) September 11, 2021
हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार, पुढचे दोन दिवस म्हणजे १२ आणि १३ तारखेपर्यंत औरंगाबाद आणि परिसरात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल. तर अगदी तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस होईल. मात्र येत्या १४ तारखेला म्हणजेच मंगळवारी औरंगाबाद, जालना, परभणी भागात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या दिवशी हवामानातील बदलाकडे लक्ष ठेवून सावध राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या अंदाजानुसार, शनिवार आणि रविवारी मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद , हिंगोली, परभणी, नांदेडमध्ये हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल. मात्र अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता फार कमी वर्तवण्यात आली आहे.
मराठवाड्यातील या जिल्ह्यात यलो अलर्ट
प्रादेशिक हवामान विभाग मुंबई यांच्या वतीनं जारी केलेल्या माहितीनुसार, १३ सप्टेंबर रोजी जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला असून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या दिवशी औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद आणि लातूरमध्ये मात्र हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल, असा अंदाज आहे. तर औरंगाबाद आणि परिसरातील पावसाचा जोर दोन दिवसांनी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. १४ सप्टेंबर रोजी औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
दरम्यान हवामान खात्याने आज कोकण, घाट परिसर आणि विदर्भातील काही जिल्ह्यांना अलर्ट जारी केला आहे. याठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पण कोकण आणि घाट परिसरात पावसाचा जोर अधिक असण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने आज पुणे रायगड आणि रत्नागिरी या तीन जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर ठाणे, सातारा, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, बुलडाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांना IMD कडून येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या जिल्ह्यात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटसह मध्यम ते मुसळधार स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.