MaharashtraNewsUpdate : गणेशोत्सवात कोरोनाचे नियम न पाळल्यास वाढू शकतात कोरोनाचे रुग्ण

मुंबई : राज्यात कोरोनाचा संसर्ग चालूच असून सक्रिय रुग्णांची संख्या वाढतच आहे . त्यामुळे आजपासून सुरु होत असलेल्या गणेशोत्सवात लोकांना गर्दी न करण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आधीच जनतेला केले असून कोरोनाच्या नियमांचे पालन न केल्यास राज्याची परिस्थिती गंभीर होईल अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान राज्याच्या आरोग्य विभागाने कोरोनाची आजची आकडेवारी जारी केली आहे. त्यानुसार राज्यात कोरोना पुन्हा हातपाय पसरू लागल्याचे दिसत आहे. राज्यातील कोरोनाच्या अॅक्टिव्ह रुग्णांचा म्हणजे उपचार घेत असलेल्या रुग्णांचा आकडा पुन्हा ५० हजार पार गेला आहे. तर बऱ्या होणाऱ्या रुग्णांचंही प्रमाण कमी झालं आहे. गेले काही दिवस राज्यातील कोरोना अॅक्टिव रुग्णांचा आकडा कमी-जास्त होत होता पण तो ५० हजारांच्या खालीच होता. आज मात्र अॅक्टिव्ह रुग्णांनी ५० हजारांचा टप्पा ओलांडला आहे. राज्यात आज दिवसभरात ४,२१९ नव्या रुग्णांची नोंद झाली आणि अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ५०,२२९ वर पोहोचली आहे.
एकिकडे अॅक्टिव्ह रुग्णांचा आकडा वाढतो आहे, तर दुसरीकडे बऱ्या होणाऱ्या रुग्णांचा आकडा मात्र कमी झाला आहे. त्यामुळे चिंता अधिक वाढली आहे. दररोज तीन हजारच्या आसपास आणि त्यापेक्षा जास्त रुग्णांना डिस्चार्ज मिळत होता. पण आज दिवसभरात फक्त २,५३८ रुग्णांनाचा डिस्चार्ज देण्यात आला आहे. तज्ज्ञांच्या मते, ऑक्टोबरमध्ये देशात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. गृह मंत्रालयाच्या सूचनेनुसार, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्थेने (NIDM) एक अहवाल तयार केला आहे. ज्यात ऑक्टोबरमध्ये तिसरी लाट येण्याची शक्यता असल्याचं म्हटलं आहे. या अहवालात तिसऱ्या लाटेदरम्यान मुलांबाबत अधिक काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. अहवालात असे म्हटले आहे की, जर देशात लसीकरणाचा वेग आणखी वाढवला नाही तर तिसऱ्या लाटेत संक्रमित लोकांची संख्या दररोज ६ लाखांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.