Maharashtra News Update : करुणा शर्मा यांच्या पिस्तूल प्रकरणात देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया

नागपूर : राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करून चर्चेत आलेल्या करुणा शर्मा यांच्या गाडीत पिस्तूल सापडल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे. करुणा शर्मा रविवारी परळीत दाखल झाल्या होत्या. यावेळी पोलिसांनी केलेल्या तपासणीत त्यांच्या वाहनामध्ये पिस्तूल आढळून आल्यानंतर ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणावर राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
याबद्दल बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले कि , यासंदर्भात सखोल चौकशी झाली पाहिजे. प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे, त्यापासून कोणाला वंचित ठेवण्याचं कारण नाही. त्या ठिकाणी जे काही घडलं आहे त्यावरुन कायदा-सुव्यवस्था कशी राखली जात आहे हे स्पष्ट होत आहे. जे आरोप प्रत्युत्तर होत आहेत आणि मिळालेलं पिस्तूल हे गंभीर असून यासंदर्भात कोणत्याही दबाबाशिवाय चौकशी झाली पाहिजे.
अनिल देशमुखांनी चौकशीला सामोरं जावे
याशिवाय अनिल देशमुख यांच्याबाबत विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना फडणवीस म्हणाले कि , मलादेखील माध्यमांकडूनच ईडीने लूकआऊट नोटीस काढली असल्याची माहिती मिळाली. आता उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय असा सर्व प्रवास झाला असल्याने त्यांनी आता कायद्याच्या दृष्टीने चौकशीला सामोरं जावं; तेच योग्य ठरेल.
मुख्यमंत्र्यांना दिले प्रत्युत्तर
दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षावर टीका करताना काही पक्ष आंदोलन करुन राजकारण करत असल्याचे म्हटले होते या टीकेला उत्तर देताना फडणवीस म्हणाले की, समोरच्यांना बोलायच्या ऐवजी आपल्या सोबतच्यांना, आपल्या पक्षातील लोकांना त्यांनी पहिले शिकवावे आणि मग आम्हाला सांगावे. महाविकास आघाडी सत्तेसाठी नव्हे तर सत्तेचे लचके तोडण्यासाठी तयार झाली आहे. प्रत्येकजण सरदार असल्यासारखा वागत आहे. जितके लचके तोडता येतील तेवढे तोडत असून नाही तोडता आले तर एकमेकांचे लचके तोडा अशी अवस्था आहे.