InformationUpdate : बोगस लस ओळखण्यासाठी केंद्राने राज्यांना सांगितल्या काही टिप्स …

नवी दिल्ली : जगभरात बनावट लसींची चर्चा सुरु झाल्यानंतर केंद्र सरकारने देशात वापरल्या जाणाऱ्या करोना लसींची सत्यता ओळखण्यासाठी काही टीप्सची यादी जारी केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात बनावट कोविशील्ड लस फिरत असल्याची कबुली देऊन जागतिक आरोग्य संघटनेने याविषयी चिंता व्यक्त केली होती. त्यानंतर केंद्र सरकारने बनावट लस ओळखण्याचे काही निकष जारी केले असून यामुळे राज्य सरकारांना आपली लस बनावट आहे कि खरी हे ओळखण्यास मदत होणार असल्याचे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.
सध्या देशात वापरात असलेल्या कोविशील्ड, कोवॅक्सिन आणि स्पुटनिक व्ही या लसी तयार करणाऱ्या कंपन्यांच्या मदतीने हे निकष तयार केले असल्याचे आरोग्य विभागाने नमूद केले आहे. दरम्यान देशात कोविशील्ड लसीच्या नावाने बनावट लसी देशात विकल्या गेल्या, असा दावा केला जात आहे. भारत सरकार या दाव्याची चौकशी करत असून आरोपांमध्ये काही तथ्य आढळल्यास कारवाई केली जाईल, असे केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी गेल्या महिन्यात सांगितले होते.
या पत्रामध्ये लस उत्पादकांनी लसीच्या बॉटलवरील लावलेले लेबल, त्याचा रंग आणि इतर तपशील दिलेले आहेत. कोविशील्ड या भारतात तयार झालेल्या लसीच्या नावाने काही बनावट लशी दक्षिणपूर्व आशिया आणि आफ्रिकेत जप्त केल्याचा दावा करणारे विविध अहवाल समोर आले आहेत. दरम्यान, भारतातही काही ठिकाणी बनावट लशी विकल्या जात असल्याचा दावा माध्यमांनी केला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने बनावट लसींबद्दल अलर्ट जारी केल्यानंतर केंद्र सरकारने अहवालांच्या आधारे याप्रकरणी चौकशीही सुरू केली आहे.